Join us  

India vs West Indies, 1st Test : कोहली, पंत, बुमराह यांना इतिहास घडवण्याची संधी; खुणावतायत सात विक्रम

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचा पहिला कसोटी सामना आज अँटिग्वा येथे खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 11:01 AM

Open in App

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचा पहिला कसोटी सामना आज अँटिग्वा येथे खेळवण्यात येणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेतील हा पहिला सामना आहे.  भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे. या कसोटी मालिकेत विराट कोहलीसह जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, रिषभ पंत आदी सात भारतीय खेळाडूंना इतिहास घडवण्याची संधी आहे.   

विराट कोहलीला सर्वात यशस्वी कर्णधार बनण्याची संधी आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराने आतापर्यंत 46 कसोटीपैकी 26 सामने जिंकले आहेत. त्याला महेंद्रसिंग धोनीचा सर्वाधिक 27 कसोटी विजयाचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.  

भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2016मध्ये 2-0 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली होती. पण, वेस्ट इंडिजमध्ये याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात तो यशस्वी झाल्यास तो इतिहास घडवू शकतो. वेस्ट इंडिजमध्ये 2-0 अशा फरकाने मालिका जिंकणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरेल.

रवींद्र जडेजाला कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 8 विकेट्सची आवश्यकता आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेत त्याने ही कामगिरी केल्यास 200 विकेट्स घेणारा तो भारताचा दहावा गोलंदाज ठरेल. जडेजाने 41 कसोटीत 192 विकेट्स घेतल्या आहेत. 

रवीचंद्रन अश्विनलाही एक विक्रम खुणावत आहे. अश्विनने 65 कसोटीत 342 विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याला 350 विकेटसाठी केवळ 8 विकेट्स हव्या आहेत. या मालिकेत आठ विकेट घेतल्यास तो अनील कुंबळे, कपिल देव आणि हरभजन सिंग यांच्या पंक्तित बसेल. 350 विकेट्स घेणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरेल.  

रिषभ पंतलाही या मालिकेत आठ फलंदाजांना माघारी पाठवून इतिहास घडवण्याची संधी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 फलंदाजांना माघारी पाठवण्याचा भारतीय यष्टिरक्षकाचा विक्रम तो नावावर करू शकतो. त्याने 9 कसोटीत 42 फलंदाजांना माघारी पाठवले आहे. यात 40 झेल व 2 स्टम्पिंग्सचा समावेश आहे. महेंद्रसिंग धोनीनं 15 कसोटीत 50 फलंदाज बाद केले होते. पहिल्याच कसोटीत पंतने हा पल्ला पार केल्यात 10 कसोटींत 50 बळी नावावर करणारा तो दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचर व ऑस्ट्रेलियाचा टीम पेन यांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करेल.  

28 वर्षीय मोहम्मद शमीला कसोटीत 150 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 6 फलंदाजांना बाद करावे लागणार आहेत. त्याने 40 कसोटीत 144 विकेट्स घेतल्या आहेत. 

जसप्रीत बुमराहने 10 कसोटीत 49 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 11 व्या कसोटीत विकेट्सचे अर्धशतक साजरे केल्यात सर्वात जलद हा पल्ला गाठणारा तो दुसरा भारतीय जलदगती गोलंदाज ठरेल.

नरेंद्र हिरवानी यांच्या विक्रमाशी तो बरोबरी करेल. भारतासाठी सर्वात जलद 50 विकेट्स या आर अश्विनने ( 9 सामने) घेतल्या आहेत.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाविराट कोहलीरवींद्र जडेजारिषभ पंतआर अश्विनजसप्रित बुमराहमोहम्मद शामी