अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच टेस्ट वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. भारताने यजमान वेस्ट इंडिजचा डाव 100 धावांत गुंडाळून 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह कर्णधार विराट कोहलीनं माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले, तर महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. परदेशातील भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी 2017मध्ये गॅले कसोटीत भारताने श्रीलंकेवर 304 धावांनी मात केली होती.
जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. उप कर्णधार अजिंक्य रहाणेची ( 102) शतकी खेळी आणि हनुमा विहारी ( 93) व कर्णधार विराट कोहली ( 51) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 419 धावांचे आव्हान उभे केले. 420 धावांचे लक्ष्य पाहूनच वेस्ट इंडिज संघाचे धाबे दणाणले होते, त्या बुमराहने त्यांना हतबल केले. बुमराहने अवघ्या 7 धावा देत विंडीजचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानंतर इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी विंडीजचा डाव 100 धावांत गुंडाळण्यात हातभार लावला. भारताने 318 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
कोहलीनं परदेशात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांत गांगुलीला ( 11 विजय) मागे टाकले आहे. कोहलीनं 26 सामन्यांत 12 विजय मिळवले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात सहा कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. शिवाय भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या धोनीच्या विक्रमाशीही कोहलीनं बरोबरी केली. दोघांच्या खात्यात 27 कसोटी विजय आहेत. कोहलीनं 47 कसोटीत हा पराक्रम केला आणि धोनीपेक्षा 13 सामने कमी खेळून त्याने ही मजल मारली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना 30 ऑगस्टपासून किंग्स्टन येथे खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती दुसऱ्या कसोटीतही केल्यास कोहली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरेल. जगभरातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये कोहली सातव्या क्रमांकावर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा हॅन्सी क्रोन्ये आणि वेस्ट इंडिजचे व्हीव्हीयन रिचर्ड्स यांच्या 27 कसोटी विजयांशी बरोबरी केली आहे.
बूम बूम बुमराह; भारतीय गोलंदाजाचा विश्वविक्रम, कोणलाही जमला नाही असा पराक्रम
वेस्ट इंडिज दारूण पराभव; भारताने 100 वर केले ऑलआऊट