गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने उभे केलेले 6 बाद 146 धावांचे लक्ष्य भारताने 19.1 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने मैदान मारले. विजयानंतर कॅप्टन कोहलीनं संघातील प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन मानले, पण याचवेळी त्याने 2023च्या वर्ल्ड कपचा विचार डोक्यात नसल्याचे मत व्यक्त केले. तो असं का म्हणाला?
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 146 धावा केल्या. दीपक चहरने विंडीजच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, किरॉन पोलार्ड आणि रोव्हमन पॉव्हेल यांनी खिंड लढवताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पोलार्डने 45 चेंडूंत 1 चौकार व 6 षटकार खेचून 58 धावा चोपल्या, तर पॉव्हेलने 20 चेंडूंत नाबाद 32 धावा केल्या. चहरने 4 धावांत 3 फलंदाज बाद केले, तर नवदीप सैनीनं 2 विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( 3) लगेच माघारी परतला. लोकेश राहुलही 20 धावा करून बाद झाला. पण, कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी करून संघाचा विजय पक्का केला. कोहलीनं 45 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीनं 59 धावा केल्या, तर पंतने 42 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 65 धावांची खेळी केली. विंडीजच्या ओशाने थॉमसने दोन विकेट्स घेतल्या.
या सामन्यानंतर कोहली म्हणाला,''खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त होती. पण, गोलंदांनी योग्य मारा करताना त्यांची कामगिरी योग्यरितीनं पार पाडली. 2023च्या वर्ल्ड कपचा आताच विचार करणे घाईचे ठरेल. जगातील सर्वोत्तम सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ बनून राहणे, हे आमचे प्राधान्य आहे. मागील 3-4 वर्ष आम्ही त्यात यश मिळवले आहे. जागतिक क्रमवारीतही आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे 2023चा वर्ल्ड कप दूर आहे. त्यासाठी बारा महिन्यांपूर्वी विचार करणे योग्य ठरेल, आता 4 वर्ष बाकी आहेत.''
पाहा व्हिडीओ...