भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा सामना मजेशीर झाला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांची शतकी खेळी, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची फटकेबाजीनं टीम इंडियाला 5 बाद 387 धावांचा डोंगर उभा करून दिला. त्यानंतर विंडीजचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतले, परंतु शे होप आणि निकोलस पूरण यांनी केलेल्या जिगरबाज खेळीनं सामन्यातील रंजकता कायम ठेवली होती. पण, मोहम्मद शमीनं दिलेले दोन धक्के आणि त्यानंतर कुलदीप यादवच्या विक्रमी हॅटट्रिकनं सामना टीम इंडियाच्या झोळीत टाकला. भारतानं हा सामना 107 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली.
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांचा बोलबाला राहिला. राहुलच्या शतकी खेळीनंतर रोहित नावाचं वादळ विशाखापट्टणममध्ये घोंगावलं. रोहितनं तुफान फटकेबाजी करताना 159 खेळी केली. रोहितची घोडदौड 44 व्या षटकात रोखण्यात विंडीजला यश आलं, परंतु त्यानं तोपर्यंत विक्रमांचा पाऊस पाडला होता. रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनीही विंडीज गोलंदाजांना धू धू धुतले. त्यांच्या फटकेबाजीनं भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. राहुलनंही 102 धावा केल्या. रोहितनं 138 चेंडूंत 17 चौकार व 5 षटकारांसह 159 धावा चोपल्या. रिषभ 16 चेंडूंत 39 धावा करून माघारी परतला. रिषभ आणि अय्यर यांनी 24 चेंडूंतील 73 धावांची भागीदारी केली. अय्यर 32 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार मारून 53 धावांत माघारी परतला. भारताना 5 बाद 387 धावा चोपल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना शे होप आणि एव्हिन लुइस यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. होपला लोकेश राहुलनं जीवदान दिलं. या जोडीनं पहिल्या दहा षटकांत 56 धावा केल्या. पण, 11व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. त्याच्या गोलंदाजीवर लुइसनं टोलावलेला चेंडू श्रेयस अय्यरनं सुरेख झेलला. लुइस 30 धावा करून माघारी परतला. पहिल्या सामन्यात खणखणीत शतक करणारा शिमरोन हेटमायर आज अपयशी ठरली. श्रेयस अय्यरनं अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना त्याला ( 4) रवींद्र जडेजाकरवी धावबाद केले. त्यानंतर पुढील षटकात जडेजानं विंडीजच्या रोस्टन चेसचा त्रिफळा उडवला.
टीम इंडियाच्या ढिसाळ कामगिरीचा प्रत्यय आला. निकोलस पूरणचा सोपा झेल दीपक चहरनं सोडला आणि त्यामुळे कर्णधार विराटचा पारा चढला. पूरण आणि होप यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. होपनं अर्धशतक झळकावताना कॅलेंडर वर्षात सर्वाधिक अर्धशतक करण्याचा ब्रायन लाराचा विक्रम मोडला. होपचं हे 2019 मधील 11 वं अर्धशतक ठरलं. मिळालेल्या जीवदानाचा पूरेपूर फायदा घेत पूरणनं 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पूरणचा झंझावात रोखण्यासाठी कोहलीनं मोहम्मद शमीला पाचारण केले आणि त्यानं टीम इंडियाला यश मिळवून दिलं. पूरण 47 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकार खेचून 75 धावा करून माघारी परतला. त्यानंतर शमीनं पहिल्याच चेंडूवर विंडीज कर्णधार किरॉन पोलार्डला ( 0) माघारी पाठवले.
भारताचा कर्णधार विराट कोहलीही पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. वन डे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दोन्ही संघांचे कर्णधार ' Golden Duck' वर बाद झाले. पण, दोन्ही कर्णधार शून्यावर बाद होण्याची ही 12वी वेळ आहे. या विकेटसह मोहम्मद शमीनं 2019 या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत अव्वल स्थान पटकावलं. शमीनं 20 सामन्यांत 21.75 च्या सरासरीनं 40 विकेट्स घेतल्या. त्यानं न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचा ( 38) विक्रम मोडला.
कुलदीप यादवनं शे होप, जेसन होल्डर आणि ए जोसेफ यांना माघारी पाठवून वन डे क्रिकेटमधील दुसऱ्या हॅटट्रिकची नोंद केली. होप 78 धावांवर माघारी परतला. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक तीन हॅटट्रिक लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. त्यानंतर वासीम अक्रम, साकलेन मुश्ताक, चामिंडा वास, ट्रेंट बोल्ट आणि कुलदीप यादव यांनी दोन हॅटट्रिक घेतल्या आहेत. इथेच विंडीजच्या हातून सामना निसटला. त्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी सामन्यातील औपचारिकता पार पाडली. किमो पॉल आणि खेरी पिएरे यांनी नवव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. कुलदीपनं 52 धावा देत 3 विकेट घेतल्या. रवींद्र जडेजानं 74 धावांत 2 विकेट टिपल्या. शमीनंही तीन विकेट घेतल्या. विंडीजनं 387 धावांच्या प्रत्युत्तरात सर्वबाद 280 धावा केल्या.
Web Title: India vs West Indies, 2nd ODI: India win by a massive 107 runs to level series 1-1
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.