भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पाहुण्यांनी बाजी मारली. शिमरोन हेटमायर आणि शे होप यांच्या शतकी खेळीनं भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. भारताचे 288 धावांचे लक्ष्य विंडीजनं 8 विकेट राखून सहज पार केले. तीन सामन्यांच्या मालिकेत विंडीजनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्या विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह मैदानावर उतरलेला दिसला. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. त्यामुळे बुमराहच्या येण्यानं संघांच मनोबल उंचावण्यात नक्की मदत मिळेल. पण...
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेला एक आठवडा शिल्लक असताना बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली होती. त्यानंतर तो उपचारासाठी लंडनमध्ये गेला होता, पण त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार नसल्याचा दिलासा चाहत्यांना मिळाला होता. त्यानंतर मायदेशात परतलेला बुमराह तंदुरुस्तीसाठी कसून सराव करत आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. ही मालिका जानेवारीत होणार आहे. पण, निवड समिती प्रुमख एमएसके प्रसाद यांच्या माहितीनुसार बुमराहचं पुनरागमन लांबणीवर पडले आहे.