भारतीय संघ आता नव्या कर्णधाराच्या म्हणजे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळतो आहे. वेस्ट इंडिजविरूद्धची मालिका ही रोहितची पूर्णवेळ वन डे कर्णधार म्हणून पहिलीच मालिका आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघातील काही खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे रोहितने इशान किशनला संघात घेत ओपनिंगला आणलं. पण आजच्या सामन्यात केएल राहुल परतला. त्यामुळे इशान किशनला संघाबाहेर करण्यात आले. रोहित-राहुल जोडी ओपनिंग करणार असं वाटत असतानाच रोहितने एक अजब चाल खेळत ऋषभ पंतला सलामीला उतरवलं. त्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. या चालीमुळे शिखर धवनचं टेन्शन नक्कीच वाढलं असून केएल राहुललाही एक सूचक संदेश देण्यात आल्याची चर्चा आहे.
शिखर धवनचं टेन्शन वाढलं!
रोहितला सलामीली उजव्या-डाव्या हाताचं कॉम्बिनेशन हवं असल्याची चर्चा होती. त्यामुळे मयंक आणि राहुल यापेक्षा शिखर धवनच्या अनुभवाला संधी मिळू शकते असं मानलं जात होतं. पण आज रोहितने पंतला सलामीला उतरवल्यामुळे एक वेगळाच बदल पाहायला मिळाला. त्यामुळे आता शिखर धवनचं संघातील स्थान अधिकच धोक्यात आल्याचं बोललं जात आहे.
केएल राहुलला सूचक संदेश
केएल राहुल जेव्हा दक्षिण आफ्रिकेत संघाचा कर्णधार होता, तेव्हा त्याने स्वत:साठी सलामीवीराची जागा राखून ठेवली होती. पण रोहित संघाचा कर्णधार असताना त्याने केएल राहुलला एक सूचक संदेश दिला. पहिल्या सामन्यात केएल राहुल नव्हताच. पण दुसऱ्या सामन्यात तो परत येताच त्याला फलंदाजीला सलामीला न उतरवता पंतला ती संधी देण्यात आली. त्यामुळे आता राहुल मधल्या फळीतच खेळणार अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात केली जात आहे.