लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या 10 षटकांत बिनबाद 55 धावा जोडल्या. सामन्याच्या 16व्या षटकात लोकेशचा एक फटका चुकला आणि तो झेलबाद होता होता वाचला. निकोलस पूरणला तो झेल टिपता आला नाही. त्यानंतर लोकेशनं 46 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रोहितनं 33 वी धाव घेत 2019मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1300 धावांचा पल्ला गाठला. त्यानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. रोहितनं संयमी खेळ केला. रोहित व राहुल या जोडीनं पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. राहुलनं विंडीजच्या गोलंदाजांना हतबल केले. त्यानं सुरेख फटकेबाजी करताना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
रोहितनंही 67 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. वन डेतील त्याचे हे 43वे तर विंडीजविरुद्धचे 11वे अर्धशतक ठरले. या अर्धशतकी कामगिरीसह त्यानं महेंद्रसिंग धोनीच्या नावावर असलेला विक्रम मोडला. वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहितनं नावावर केला. त्यानं आजच्या सामन्यात एक षटकार खेचला. विंडीजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 29 षटकार खेचणारा तो पहिला भारतीय ठरला. त्यानं धोनीचा 28 षटकारांचा विक्रम मोडला. या विक्रमात विराट कोहली 25 षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे.
रोहितची कर्णधार कोहलीवर कुरघोडी, 2019मध्ये कुणालाच जमली नाही अशी कामगिरी
या मालिकेपूर्वी वन डे क्रिकेट स्पर्धेत 2019मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट अव्वल स्थानी होता. त्याच्या नावावर 23 सामन्यांत 64.40च्या सरासरीनं 1288 धावा होत्या. या शर्यतीत रोहित 1232 धावांसह दुसऱ्या स्थानावर होता. रोहितनं 25 सामन्यांत 53.56च्या सरासरीनं या धावा केल्या होत्या. त्यामुळे या मालिकेनंतर या क्रमवारीत अदलाबदल होते, की स्थान तसेच राहते, याची उत्सुकता लागली होती. विराटला पहिल्या वन डे सामन्यात केवळ चार धावा करता आल्या, तर रोहितनं 36 धावा केल्या.
आज दुसऱ्या सामन्यात रोहितनं 33 धावांची भर घालून 2019मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत अव्वल स्थान पटकावले. रोहितच्या नावावर आता 1300 धावा झाल्या आहेत, तर विराट 1292 धावांसह दुसऱ्या स्थानावर गेला आहे. या कामगिरीसह त्यानं लिस्ट ए क्रिकेटमध्ये 11000 धावांचा पल्लाही पार केला.