भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांचा बोलबाला राहिला. राहुलच्या शतकी खेळीनंतर रोहित नावाचं वादळ विशाखापट्टणममध्ये घोंगावलं. रोहितनं तुफान फटकेबाजी करताना 159 खेळी केली. रोहितची घोडदौड 44 व्या षटकात रोखण्यात विंडीजला यश आलं, परंतु त्यानं तोपर्यंत विक्रमांचा पाऊस पाडला होता.
लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या 10 षटकांत बिनबाद 55 धावा जोडल्या. सामन्याच्या 16व्या षटकात लोकेशचा एक फटका चुकला आणि तो झेलबाद होता होता वाचला. निकोलस पूरणला तो झेल टिपता आला नाही. त्यानंतर लोकेशनं 46 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रोहितनं 33 वी धाव घेत 2019मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1300 धावांचा पल्ला गाठला. त्यानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. रोहितनं संयमी खेळ केला. रोहित व राहुल या जोडीनं पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. राहुलनं विंडीजच्या गोलंदाजांना हतबल केले. त्यानं सुरेख फटकेबाजी करताना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
रोहितनंही 67 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. वन डेतील त्याचे हे 43वे तर विंडीजविरुद्धचे 11वे अर्धशतक ठरले. या अर्धशतकी कामगिरीसह त्यानं महेंद्रसिंग धोनीच्या नावावर असलेला विक्रम मोडला. वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहितनं नावावर केला. त्यानं आजच्या सामन्यात एक षटकार खेचला. विंडीजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 29 षटकार खेचणारा तो पहिला भारतीय ठरला. त्यानं धोनीचा 28 षटकारांचा विक्रम मोडला. या विक्रमात विराट कोहली 25 षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे.
2019मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही रोहितनं नावावर केला. सरत्या वर्षातील हे त्याचे 12वे अर्धशतक ठरले. त्यानं वेस्ट इंडिजच्या शे होप व टीम इंडियाच्या विराट कोहली यांचा 11 अर्धशतकांचा विक्रम मोडला. रोहितनं त्यानंतर धावांचा वेग वाढवला. त्यानं अर्धशतकाचे शतकात रुपातंर करताना 107 चेंडूंत 100 धावा केल्या. वनडेतील त्याचे हे 28वे शतक ठरलं, तर वेस्ट इंडिजविरुद्धचे तिसरे शतक ठरले. त्यापाठोपाठ राहुलनंही 103 चेंडूंत शतक पूर्ण केले. वन डेतील त्याचे हे तिसरे शतक आहे. पण, 37व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लोकेश झेलबाद झाला. अल्झारी जोसेफनं त्याला 102 धावांवर माघारी पाठवले.
विशाखापट्टणमवर धावांचा पाऊस पाडणारा कोहली आज पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. किरॉन पोलार्डनं चतुराईनं त्याला बाद केले. सात वर्षानंतर विराट प्रथमच वन डेत पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यापूर्वी 2013मध्ये धर्मशाला येथे इंग्लंडविरुद्ध गोल्डन डकवर बाद झाला होता. तत्पूर्वी 2011मध्ये विंडीजविरुद्ध त्याला पहिल्याच चेंडूवर बाद व्हावे लागले होते. त्यानंतर रोहितची बॅट चांगलीच तळपली. त्यानं विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई करताना श्रेयस अय्यरसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी धावा जोडल्या. 44व्या षटकात रोहितचा झंझावात थांबला. कोट्रेलनं त्याला बाद केले. रोहितनं 138 चेंडूंत 17 चौकार व 5 षटकारांसह 159 धावा चोपल्या. रोहितनं या वर्षात 77 षटकार खेचून स्वतःच्याच नावावरली 74 ( 2018) षटकारांचा विक्रम मोडला.