लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या 10 षटकांत बिनबाद 55 धावा जोडल्या. सामन्याच्या 16व्या षटकात लोकेशचा एक फटका चुकला आणि तो झेलबाद होता होता वाचला. निकोलस पूरणला तो झेल टिपता आला नाही. त्यानंतर लोकेशनं 46 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रोहितनं 33 वी धाव घेत 2019मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1300 धावांचा पल्ला गाठला. त्यानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. रोहितनं संयमी खेळ केला. रोहित व राहुल या जोडीनं पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. राहुलनं विंडीजच्या गोलंदाजांना हतबल केले. त्यानं सुरेख फटकेबाजी करताना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
रोहितनंही 67 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. वन डेतील त्याचे हे 43वे तर विंडीजविरुद्धचे 11वे अर्धशतक ठरले. या अर्धशतकी कामगिरीसह त्यानं महेंद्रसिंग धोनीच्या नावावर असलेला विक्रम मोडला. वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहितनं नावावर केला. त्यानं आजच्या सामन्यात एक षटकार खेचला. विंडीजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 29 षटकार खेचणारा तो पहिला भारतीय ठरला. त्यानं धोनीचा 28 षटकारांचा विक्रम मोडला. या विक्रमात विराट कोहली 25 षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे.
2019मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही रोहितनं नावावर केला. सरत्या वर्षातील हे त्याचे 12वे अर्धशतक ठरले. त्यानं वेस्ट इंडिजच्या शे होप व टीम इंडियाच्या विराट कोहली यांचा 11 अर्धशतकांचा विक्रम मोडला.
Web Title: India vs West Indies, 2nd ODI: Rohit Sharma hit more half century in 2019 in ODI, break Virat kohli and Shai Hope record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.