भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना आज तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. पहिल्या ट्वेंटी-20त विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी जोरदार फटकेबाजी करताना टीम इंडियाला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजनं ठेवलेलं 208 धावांचं लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स राखून सहज पार केले. या सामन्यात विराट, राहुल आणि युजवेंद्र चहल यांनी वेगवेगळ्या विक्रमांना गवसणी घातली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण काय विक्रम करतो याची उत्सुकता आहेच. पण, त्यापेक्षा येथील स्टेडियमबाहेरील एक गोष्ट सर्वांचे लक्ष वेधत आहे. ही गोष्ट माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याशी निगडीत असल्यानं त्याची चर्चा अधिक रंगली आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबतच्या चर्चा संपता संपेना. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं वेस्ट इंडिज दौरा, मायदेशात झालेली दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. 6 डिसेंबरपासून सुरू झालेल्या वेस्ट इंडिज मालिकेतली धोनीचा टीम इंडियात समावेश नाही. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबईत एका कार्यक्रमात धोनीलाही हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यानं जानेवारीपर्यंत काही विचारू नका असे उत्तर दिले होते.
असे असले तरी धोनीचे चाहते त्याची आतुरतेनं वाट पाहत आहे आणि याची प्रचिती तिरुअनंतपूरम येथे आली. धोनीच्या चाहत्यांनी स्टेडियमबाहेर चक्क धोनीच्या फोटोचा 40 फुटांचा बॅनर लावला आहे.
महेंद्रसिंग धोनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणार का? बीसीसीआय अध्यक्ष गांगुली भडकला
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) सर्वसाधारण सभेतही धोनीच्या निवृत्तीबाबत अध्यक्ष सौरव गांगुलीला विचारण्यात आला. धोनी आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे का, या प्रश्नावर गांगुली भडकला. गांगुलीनं मात्र या प्रश्नावर भडकला. तो म्हणाला,''हा प्रश्न तुम्ही धोनीलाच विचारा. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला आणखी बराच कालावधी आहे. पण, पुढील तीन महिन्यांत चित्र स्पष्ट होईल. काही गोष्टी सार्वजनिकरित्या सांगता येत नाहीत. धोनीबद्दलही योग्य निर्णय घेतला जाईल आणि तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल.''
धोनीचं टीम इंडियासाठी अमुल्य योगदान आहे आणि त्याच्याबद्दल असा कोणताही निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार केला जाईल. गांगुली म्हणाला,''बीसीसीआय, धोनी आणि निवड समिती यांच्यात पारदर्शकता आहे. धोनीसारख्या दिग्गजाबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास काही चर्चा हा बंद दरवाजातच ठेवायला हव्यात.'