फ्लोरिडा : भारत वि. वेस्ट इंडिज : दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतानं डकवर्थ लुईसनुसार वेस्ट इंडिजवर 22 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना पावसानं व्यत्यय आणल्यानं खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी वेस्ट इंडिजनं 15.3 षटकांत 4 बाद 98 धावा केल्या होत्या. पावसानं विश्रांती न घेतल्यानं अखेर डकवर्थ लुईसनुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं. या सामन्यासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. फलंदाजीसह गोलंदाजीतही चुणूक दाखवणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पण, या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मानं विश्वविक्रम नावावर केला.
या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने 67 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत रोहितने भाराताला आक्रमक सुरुवात करून दिली आणि त्यामुळे भारताने 167 धावा केल्या. रोहित आणि धवन यांनी यावेळी 67 धावांची सलामी करून दिली. धवन ( 23) बाद झाल्यावरही रोहितने आपली धडाकेबाज फलंदाजी कायम ठेवली. रोहितने 51 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 67 धावांची खेळी साकारली. रोहितनं या खेळीच्या जोरावर युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 105 षटकारांचा गेलचा विक्रम रोहितनं काल मोडला.
ट्वेंटी-20 सर्वाधिक षटकार107 - रोहित शर्मा ( भारत) 105 - ख्रिस गेल ( वेस्ट इंडिज) 103 - मार्टिन गुप्तील ( न्यूझीलंड) 92 - कॉलिन मुन्रो ( न्यूझीलंड ) 91 - ब्रेंडन मॅकलम ( न्यूझीलंड )
त्याशिवाय धवन आणि रोहित यांनी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ भागीदारी करणाऱ्या फलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. रोहित-धवनची ही ट्वेंटी-20 क्रिकेटमधील दहावी अर्धशतकी भागीदारी आहे. या विक्रमात न्यूझीलंडचे मार्टिन गुप्तील आणि केन विलियम्सन हे 11 अर्धशतकी भागीदारीसह अव्वल स्थानी आहेत. त्यानंतर के कोएत्झर व जी. मुनसी ( 9) आणि डेव्हिड वॉर्नर व शेन वॉटसन ( 9) यांचा क्रमांक आहे.