ठळक मुद्देशिवम दुबेचं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20तील पहिलं अर्धशतकविंडीजच्या केस्रीक विलियम्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. वेस्ट इंडिजनं संघात एक बदल करताना दिनेश रामदिनच्या जागी निकोलस पूरणला पाचारण केले. पण, विराटनं संघात बदल नसल्याचं जाहीर केले. शिवम दुबेनं पहिलं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील अर्धशतक झळकावताना आजचा दिवस गाजवला आणि त्यामुळे भारताला समाधानकारक पल्ला गाठता आला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा योग्य अंदाज बांधताना भारताच्या धावगतीवर वेसण घातले. विंडीजच्या केस्रीक विलियम्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी संयमी सुरुवात केली. पण, चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर खॅरी पिएरे यानं लोकेश राहुलला माघारी पाठवलं. राहुल 11 धावा करून शिमरोन हेटमायरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराटनं एक चतुर खेळी केली. स्वतः फलंदाजीला न येता विराटनं डावखुऱ्या शिवम दुबेला फलंदाजीला पाठवले. पण, दोन्ही खेळाडूंना मोठे फटके मारताना अडचण जाणवत होती. टीम इंडियानं पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या.
आठव्या षटकात जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर शिवमनं पहिल्या दोन चेंडूवर षटकार व चौकार खेचला, परंतु चौथ्या चेंडूवर होल्डरनं भारताला धक्का दिला. त्याच्या गोलंदाजीवर पॅडल स्वीप मारण्याच्या प्रयत्नात रोहित त्रिफळाचीत झाला. रोहित 15 धावा करून माघारी परतला. त्यानंतर शिवमनं दमदार फटकेबाजी केली. त्यानं पोलार्डच्या एकाच षटकात तीन खणखणीत षटकार खेचले आणि नंतर ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतकही पूर्ण केले. त्याचा हा झंझावात हेडन वॉल्श ज्युनियरनं थांबवला. 11व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्यानं शिवमला हेटमायर करवी झेलबाद केले. शिवमने 30 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 54 धावा चोपल्या.
विराट 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. विलियम्सने त्याला बाद केले. विराटनं 19 धावा केल्या, परंतु तो ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्यानं 74 सामन्यांत 2563 धावा केल्या आहेत. तर रोहित 103 सामन्यांत 2562 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. विराटची विकेट घेतल्यानंतर विलियम्सनं तोंडावर बोट ठेवत विराटला डिवचलं. पहिल्या सामन्यात विराटनं नोटबूक साईन करताना दोन वर्षांपूर्वीचा वचपा काढला होता. त्याला विलियम्सनं पुन्हा उत्तर दिलं. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात या दोघांमधील द्वंद पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. श्रेयस अय्यरला अपयश आले. तो 10 धावा करून माघारी परतला. भारतानं 20 षटकांत 7 बाद 170 धावांपर्यंत मजल मारली.
Web Title: India vs West Indies, 2nd T20I : Team India register 170/7 in 20 overs, West Indies need 171 to win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.