भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना आज तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. पहिल्या ट्वेंटी-20त विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी जोरदार फटकेबाजी करताना टीम इंडियाला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजनं ठेवलेलं 208 धावांचं लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स राखून सहज पार केले. या सामन्यात विराट, राहुल आणि युजवेंद्र चहल यांनी वेगवेगळ्या विक्रमांना गवसणी घातली होती. आजचा सामना जिंकून टीम इंडिया आणखी एक मालिका खिशात घालण्यासाठी उत्सुक आहे. पण, या सामन्याआधीच विंडीजच्या दिनेश रामदिननं मनं जिंकणारी कृती केली.
आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आव्हान टीकवण्याचा प्रयत्न वेस्ट इंडिजला करावा लागणार आहे. विंडीजनं पहिल्या सामन्यात फलंदाजीत आपली कामगिरी चोख बजावली, परंतु गोलंदाजीत त्यांना अपयश आले. कर्णधार किरॉन पोलार्डनंही गोलंदाजांचे चांगलेच कान टोचले आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघ जेव्हा मैदानावर दाखल होत होते, तेव्हा स्टेडियमबाहेर एका सहा वर्षाच्या चिमुरडीनं विंडीजच्या दिनेश रामदिनचं लक्ष वेधलं. त्यानं संघाच्या बसमधून खाली उतरून त्या मुलीची भेट घेतली अन् तिला थोडे पैसे व सामन्याचे तिकीट गिफ्ट केले. त्याची ही कृती पाहून सर्वांची मनं जिंकली.