किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने वेस्ट इंडिजच्या धर्तीवर एक इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजच्या धर्तीवर असा पराक्रम करणारा बुमरा हा आतापर्यंतचा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. भारताच्या हनुमा विहारीच्या शतकाच्या जोरावर भारताने 416 धावांपर्यंत मजल मारली. पण या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 87 अशी अवस्था आहे. यावेळी वेस्ट इंडिजचा कर्दनकाळ ठरला तो बुमरा. कारण बुमराने सातपैकी सहा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली आहे. पण बुमराचा पराक्रम फक्त एवढाच नाही.
बुमराने वेस्ट इंडिजच्या सहा फलंदाजाना बाद करत त्यांचे कंबरडे मोडले. पण बुमराने या सामन्यात हॅट्रीकही साधली आहे. आतापर्यंत तो भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक साकारणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताकडून हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक साकारली होती.
बुमरा हा वेस्ट इंडिजच्या धर्तीवर कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक साकारणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. कारण हरभजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि इरफानने पाकिस्तानविरुद्ध हॅट्रिक साकारली होती. पण वेस्ट इंडिजच्या धर्तीवर एकाही भारतीय गोलंदाजांना हॅट्रिक साकारता आली नव्हती. त्यामुळे बुमराने ही वेस्ट इंडिजच्या धर्तीवर हॅट्रक साकारत इतिहास रचला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 416 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार झालेल्या भारताच्या अष्टपैलू हनुमा विहारीने पहिल्या डावात शतकी कामगिरी केली. सबीना पार्कच्या मैदानात त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक साजरे केलं. त्यासाठी त्याने २०० चेंडूचा सामना करत 16 चौकार ठोकले. विशेष म्हणजे टीम इंडियाचा फलंदाज ईशांत शर्मानेही चौकाराच्या मदतीने कसोटी कारकिर्दीतील आपले पहिलं अर्धशतक झळकावले. या दोघांनी मिळून १०० धावांची भागीदारी देखील पूर्ण केली.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतची विकेट गेली आणि भारताला धक्का बसला. भारताला पंतकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण पंतला आजच्या दिवशी फक्त एकच चेंडू खेळता आला. पंत आणि हनुमा विहारी हे आजच्या दिवसाची कशी सुरुवात करतात, हे पाहणे उत्सुकतेचे होते. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारून देइल, अशी चाहत्यांना आशा होती. पण पंतने पहिल्याच चेंडूवर आपली विकेट बहाल करत चाहत्यांना नाराज केले. त्यानंतर, हनुमाने उत्कृष्ट खेळ करत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची कामगिरी बजावली.