किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : लोकेश राहुल हा भारताचा कर्णधार विराट कोहलीचा लाडका खेळाडू समजला जातो. आतापर्यंत राहुलला भरपूर संधी मिळाली आहे. पण राहुलला अजूनही चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याला अजूनही छाप पाडता आलेली नाही. जर राहुल सातत्याने अपयशी ठरत असेल तर रोहित शर्माला कसोटी संघात स्थान का दिले जात नाही? असा सवाल आता चाहते विचारू लागले आहेत.
वेस्ट इंडिज दौऱ्यात राहुलला अजूनही सूर सापडलेला दिसत नाही. कारण त्याच्याकडून मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात राहुलला फक्त १३ धावाच करत आल्या. भारताला या सामन्यात राहुलच्या रुपातच पहिला धक्का बसला. स्विंग होणाऱ्या चेंडूवर राहुल आपली विकेट बहाल करत असल्याचे दिसून आले आहे. पण तरीही त्याला बऱ्याच संधी मिळत आहेत. अपयशी खेळाडूला जर एवढ्या संधी मिळत असतील तर रोहितला का नाही संघात स्थान दिले जात आहे, हा चाहत्यांचा सवाल आहे.
सलामीवीर लोकेश राहुल (१३) पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर चेतेश्वर पुजाराही (६) स्वस्तात परतल्याने भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात अडखळती सुरुवात झाली. भारताने ४५ षटकात ३ बाद १२३ धावा अशी मजल मारली. मयांक अग्रवालने १२७ चेंडूत ७ चौकारांसह ५५ धावांची खेळी करत भारताला सावरले.
सबिना पार्कवर सुरु झालेला हा सामना दोन्ही संघासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरा सामना आहे. विंडीज कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यांतर राहुल आणि मयांक यांनी चौकारांची फटकेबाजी करत हा निर्णय चुकीचा ठरविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपला निर्णय योग्य असल्याचे स्वत: कर्णधार होल्डर यानेच सिद्ध करताना राहुलला बाद केले.खेळपट्टीवर चांगला स्थिरावलेला दिसत असताना पुन्हा एकदा राहुल अपयशी ठरला. त्याने २६ चेंडूत २ चौकारांसह १३ धावा केल्या. यानंतर खेळपट्टीवर आलेला पुजाराही चाचपडत खेळत होता. पहिल्या कसोटीतही चांगल्या सुरुवातीनंतर स्वस्तात परतलेल्या पुजाराच्या खेळीत आत्मविश्वास दिसत नव्हता. २५ चेंडूत केवळ ६ धावा काढून तो कॉर्नवॉलचा बळी ठरला.
दोन प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मयांक आणि कर्णधार विराट कोहली यांच्यावर मोठी जबाबदारी आली. दोघांनी अपेक्षित खेळ करताना भारताचा डाव सावरत तिसºया गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी केली. हे दोघे चांगल्या स्थितीत दिसत असतानाच पुन्हा एकदा होल्डरने भारताला धक्का देत मयांकला माघारी धाडले. कोहलीने सावध खेळी करताना 76 धावा केल्या. पहिल्यादिवस अखेर विहारी 42 आणि रिशभ पंत 27 धावांवर नाबाद आहेत. होल्डरने २ बळी घेत चांगला मारा केला.