किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून किंगस्टन येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातही विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. पहिल्या कसोटी भारताने 318 धावांनी दणदणीत विजय मिळवत खात्यात 60 गुण जमा केले आहेत. परदेशातील टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय आहे.
अजिंक्य रहाणेने झळकावलेले दहावे शतक व हनुमा विहारीच्या 93 धावांनंतर जसप्रीत बुमराहने अवघ्या 7 धावांत घेतलेल्या 5 बळींमुळे पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा 318 धावांनी धुव्वा उडविला. रविवारी, चौथ्या दिवशी विजयासाठी 419 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान दुसऱ्या डावात 100 धावांवर गारद झाला. विशेष म्हणजे, विंडीजच्या सर्व फलंदाजांना भारताच्या तिन्ही वेगवान गोलंदाजांनी बाद केले. इशांतने 31 धावांत 3 तर, शमीने 13 धावांत 2 बळी घेत बुमराहला चांगली साथ दिली. एकवेळ विंडीजच्या 9 बाद 50 धावा झाल्या होत्या. त्यानंतर केमार रोच (36) आणि कमिन्स (नाबाद 19) या जोडीने दहाव्या विकेटसाठी 50 धावा जोडत पराभव लांबविला. अखेर इशांतने रोचला बाद करीत भारताच्या विजयावर शिक्का मारला.
आजपासून सुरू होणाऱ्या कसोटीत भारतीय संघात बदल करण्याची कॅप्टन विराट कोहलीची इच्छा अजिबात दिसत नाही. पण, कोहलीनं सातत्यानं संघात बदल करण्याचे सत्र कायम राखले आहे. त्यामुळे या सामन्यात निदान एक तरी बदल होईल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत संघात आर अश्विनला संधी मिळते की रोहित शर्माला हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
संभाव्य संघ :विराट कोहली. मयांक अग्रवाल, लोकेश राहुल/रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विराही, रिषभ पंत, रवींद्र जडेजा/आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
विंडीजचा खेळाडू तंदुरूस्त झाला, टीम इंडियाची डोकेदुखी वाढवण्यासाठी संघात परतला
या सामन्यासाठी विंडीजचा प्रमुख खेळाडू किमो पॉल तंदुरुस्त झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्यामुळे पहिल्या कसोटीत मिग्युएल कमिन्सला संधी मिळाली होती. पॉल तंदुरुस्त झाल्यामुळे कमिन्सला संघाबाहेर जावे लागले आहे. भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 30 ऑगस्टपासून किंगस्टन येथे सुरू होणार आहे. कमिन्सला पहिल्या कसोटीत एकही विकेट घेतला आली नाही. ट्वेंटी-20 मालिकेत पॉलने शिखर धवन, मनिष पांडे आणि कृणाल पांड्या या प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले होते.
संभाव्य संघ - जेसन होल्डर, क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शॅमर्ह ब्रुक्स, जॉन कॅम्प्बेल, रोस्टन चेस, रॅहकिम कोर्नवॉल, जॅहमर हॅमिल्टन, शेनॉन गॅब्रिएल, शिमरॉन हेटमायर, शे होप, किमो पॉल, केमार रोच.
Web Title: India vs West Indies, 2nd Test Playing XI: Ashwin or Jadeja, Rohit as opener? Here's who Kohli might select
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.