India vs West Indies 3rd ODI : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा व निर्णायक वन डे सामना आज होत आहे. भारताने पहिल्या वन डेत दमदार विजय मिळवला, परंतु यजमान वेस्ट इंडिजन दुसरी वन डे जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा व विराट कोहली यांना विश्रांती दिली गेली होती आणि हा निर्णय विंडीजच्या पथ्यावर पडला. आज भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन्ही अनुभवी फलंदाज परततात का, याची उत्सुकता आहे. २००६ नंतर विंडीजला भारताविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याची नामी संधी आहे
वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ प्रयोग करताना दिसतोय. पहिल्या वन डेमध्येही युवा खेळाडूंना आघाडीला फलंदाजीला पाठवले होते, परंतु त्यांचे अपयश पाहून रोहित सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. विराटला तर संधीच मिळाली नाही. पहिल्या वन डेत ११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ५ विकेट्स गमवाव्या लागल्या होत्या. इशान किशन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर हे आघाडीला फलंदाजीला आले होते. दुसऱ्या वन डेत विराट व रोहितच्या अनुपस्थितीत भारताचा संपूर्ण संघ १८१ धावांत तंबूत परतला होता.
हार्दिक पांड्या आज पुन्हा नाणेफेकीला आल्याने रोहित शर्मा खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. विराट कोहलीलाही विश्रांती दिली गेली आहे. अक्षर पटलेच्या जागी आज ऋतुराज गायकवाडला संधी दिली गेली आहे. उम्रान मलिकच्या जागी आज जयदेव उनाडकट खेळणार आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.