India vs West Indies 3rd ODI : इशान किशन आणि शुबमन गिल या दोघांनी तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली. इशानने सातत्य राखताना मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावले, तर गिलनेही आज फिफ्टी मारून फॉर्म मिळवला. गिलसोबत शतकी भागीदारी करून इशानने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आणि MS Dhoniशी बरोबरी केली. २०व्या षटकात इशान यष्टिचीत झाला. यानिक कारियाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् त्याला ७७ धावांवर माघारी जावे लागले. त्याने ८ चौकार व ३ षटकार खेचले व गिलसह १४३ धावांची भागीदारी केली.
टीम इंडिया कसा जिंकणार वर्ल्ड कप? १० वन डे सामने शिल्लक तरी 'तळ्यात मळ्यात'; अनेक प्रश्न अनुत्तरीत
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऋतुराज गायकवाड व जयदेव उनाडकट या दोन बदलांसह मैदानावर उतरला आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला बोलावले आहे. इशान किशन व शुबमन गिल या दोघांनी पहिल्या १० षटकांत ७३ धावा चोपल्या आणि नशीबाचीही त्यांना साथ मिळाली. इशानचा एक झेल विंडीजच्या खेळाडूने सोडला अन् त्याने उत्तुंग फटकेबाजी केली. इशानने या वन डे मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावून सातत्य दाखवून दिले. त्याने शुबमन गिलसह १३.२ षटकांत फलकावर शंभर धावा चढवल्या आहेत.
इशानने या मालिकेत ५२ ( ४६), ५५ ( ५५) आणि ५०*(४३) असे सलग तीन अर्धशतक झळकावले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धचे हे त्याचे तिसरे अर्धशतक ठरले अन् वन डेत भारतीय यष्टिरक्षकाने विंडीजविरुद्ध ३ शतक झळकावण्याची ही दुसरी वेळ ठरली. महेंद्रसिंग धोनीने विंडीजविरुद्ध तीन अर्धशतकं झळकावली आहेत. एका मालिकेत सलग तीन अर्धशतक झळकावणारा इशान हा भारताचा सहावा फलंदाज ठरला. यापूर्वी, कृष्णमचारी श्रीकांत, दीलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्रसिंग धोनी व श्रेयस अय्यर यांनी हा पराक्रम केला आहे.