India vs West Indies 3rd ODI : रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत भारताचे युवा खेळाडू आज चांगले खेळले. इशान किशनने फॉर्म कायम राखून सलग तिसरी फिफ्टी झळकावली. संजू सॅमसनची फटकेबाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. शुबमन गिलनेही फॉर्म मिळवला, परंतु शतकाच्या उंबरठ्यावर तो झेल देऊन माघारी परतला. ऋतुराज गायकवाडला फार काही करता आले नाही. कर्णधार हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यादव यांनी अखेरच्या षटकांत समाधानकारक फटकेबाजी करून विंडीजसमोर तगडे लक्ष्य उभे केले.
MS Dhoniशी बरोबरी! इशान किशनने पटकावले श्रीकांत, वेंगसरकर, अझरुद्दीन यांच्या पंक्तित स्थान
प्रथम फलंदाजीला आलेल्या इशान किशन आणि शुबमन गिल या दोघांनी भारतीय संघाला १४३ धावांची सलामी दिली. वेस्ट इंडिजमधील वन डे तील भारतीय सलामीवीरांची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. इशानने सातत्य राखताना मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावले. २०व्या षटकात इशानला बाद करण्यात त्यांना यश आले. यानिक कारियाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इशान यष्टिचीत झाला. त्याने ८ चौकार व ३ षटकारांसह ७७ धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाडला ( ८) तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली, परंतु अल्झारी जोसेफने त्याला स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. संजू सॅमसन आज आक्रमक पवित्र्यात दिसला अन् त्याने दुसराच चेंडू सीमापार पाठवला. शुबमनही दुसऱ्या बाजूने नाविण्यपूर्ण फटके मारताना दिसला. या दोघांनी ३५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
संजूची फटकेबाजी पाहण्यासारखी होती. संजूने ४१ चेंडूंत २ चौकार व ४ खणखणीत षटकार खेचून ५१ धावांची खेळी केली. कर्णधार हार्दिक पांड्या आणि शुबमन या जोडीला ( ४१ चेंडूंत २१ धावा) धावांची गती कायम राखता आली नाही. विंडीजच्या फिरकीपटूंनी चांगला मारा केला आणि त्या दडपणात शुबमन शतकाच्या उंबरठ्यावर विकेट देऊन बसला. शुबमन ९२ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ८५ धावांवर झेलबाद झाला. ( पाहा शुबमनची विकेट ) या विकेटनंतर हार्दिक व सूर्यकुमार यादव यांनी चांगला खेळ करताना ४९ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. सूर्या ३० चेंडूंत ३५ धावांवर झेलबाद झाला. हार्दिकनेही ४५ चेंडूंत वन डेतील १०वे अर्धशतक पूर्ण केले. हार्दिकने ५२ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७० धावा करताना भारताला ५ बाद ३५१ धावांपर्यंत पोहोचवले.
Web Title: India vs West Indies 3rd ODI Marathi : Shubman Gill ( 85), Ishan Kishan ( 77), Sanju Samson ( 51) & Hardik Pandya (70* ) scored Fifty, India 351/5
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.