India vs West Indies 3rd ODI : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात २०० धावांनी दणदणीत विजय मिळवून वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. शुबमन गिल, इशान किशन, हार्दिक पांड्या व संजू सॅमसन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. मुकेश कुमारने पहिल्याच स्पेलमध्ये विंडीजचे ३ फलंदाज १७ धावांवर तंबूत पाठवले. शार्दूल ठाकूरने ४ व कुलदीप यादवने २ धक्के दिले. इशान ( ७७) व शुबमन ( ८५) यांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धाव जोडल्या. संजू सॅमसन ( ५१), सूर्यकुमार यादव ( ३५) यांनी चांगले योगदान दिले. अखेरच्या षटकांत हार्दिकने ५२ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७० धावा करताना भारताला ५ बाद ३५१ धावांपर्यंत पोहोचवले. वेस्ट इंडिजच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना मुकेश कुमारने १७ धावांतच माघारी पाठवले होते. मुकेशने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ५-१-१५-३ अशी गोलंदाजी केली. त्यानंतर शार्दूलने ३७ धावांत ४ आणि कुलदीपने २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. जयदेव उनाडकटनेही एक बळी टिपला.
वेस्ट इंडिजकडून एकिल एथानेझ ( ३२), गुडाकेश मोती ( ३९*), अल्झारी जोसेफ ( २६) यांनी चांगला खेळ केला. गुडाकेश मोती व अल्झारी जोसेफ यांनी नवव्या विकेटसाठी चांगली खिंड लढवली आणि ६० चेंडूंत ५५ धावांची भागीदारी केली. या सामन्यातील शेवटची विकेट कुलदीपला मिळाली असती, परंतु तिथे गोंधळ झालेला पाहायला मिळाला. कुलदीपच्या गोलंदाजीवर जेडन सील्ससाठी जोरदार अपील झाले. चेंडू सील्सच्या पायाला लागून स्लीपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूच्या हाती विसावला. मैदानावरील अम्पायरने फलंदाजाला बाद दिले, सील्सने त्वरित तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागितली.
तिसऱ्या अम्पायरने रिप्लेत LBWआहे का हे चेक केलं अन् Umpire Call दिले. त्यामुळे भारतीय खेळाडू जल्लोष करू लागले. पण मैदानावरील अम्पायरने विंडीजच्या फलंदाजाला झेलबाद दिले होते आणि त्यामुळे तिसऱ्या अम्पायरचा Umpire Call हा निर्णय त्याला लागू झाला नाही. त्यामुळे सील्सला नाबाद दिले गेले. हार्दिकने जेव्हा याबाबत विचारले, तेव्हा अम्पायरने त्याला सर्व समजावून सांगितले. पुढच्या षटकात शार्दूलने ही विकेट मिळवून दिली.