पोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून अखेरचा वन डे सामना आज पोर्ट ऑफ स्पेन येते होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वन डे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, तर दुसऱ्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला. पहिल्या सामन्यात केवळ 13 षटकं झाली, तर दुसरा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे 59 धावांनी जिंकला होता. आता तिसऱ्या वन डेतही विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न असेल, तर वेस्ट इंडिजला विजय मिळवून ख्रिस गेलला निरोप देण्याची संधी आहे.
पण, या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आज दिवसभर 40 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पण, त्याचा सामन्यावर अधिक परिणाम जाणवणार नाही. येथील खेळपट्टी ही फलंदाजांना मदत करणारी असणार आहे. पण, पावसाचा किंचितसा व्यत्यय लक्षात घेता 270+ धावाही आव्हानात्मक ठरू शकतात.
हिटमॅन रोहित शर्मा आज युवराज सिंगचा 'खास' विक्रम मोडणार!
भारतीय सलामीवर रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात खास विक्रम करण्याची संधी आहे. रोहितला त्यासाठी केवळ 26 धावांचा पल्ला ओलांडावा लागणार आहे. वन डे क्रिकेटमध्ये रोहितनं 217 सामन्यांत 48.74च्या सरासरीनं 8676 धावा केल्या आहेत. त्यात 27 शतकं आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. युवराजने 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. रोहितला सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत सातव्या क्रमांकावर येण्यासाठी 26 धावांची गरज आहे. या क्रमवारीत सचिन तेंडुलकर ( 18426), विराट कोहली ( 11406), सौरव गांगुली ( 11363), राहुल द्रविड ( 10889), महेंद्रसिंग धोनी ( 10773) आणि मोहम्मद अझरुद्दीन ( 9378) हे आघाडीवर आहेत.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, लोकेश राहूल, मनिष पांडे, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाई होप, शिमरोन हेटमायेर, निकोलस पुरन, रोस्टन चेस, फॅबियन अॅलेन, कार्लोस ब्रेथवेट, किमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, केमार रोच