पोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय सलामीवर रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात खास विक्रम करण्याची संधी आहे. रोहितला त्यासाठी केवळ 26 धावांचा पल्ला ओलांडावा लागणार आहे. विंडीजविरुद्धच्या आज होणाऱ्या सामन्यात रोहितला भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचा विक्रम मोडण्याची संधी आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या रोहितला या दौऱ्यावर सातत्य राखण्यात यश आले आहे. दुसऱ्या वन डेत त्याला अपयश आले होते, परंतु तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
वन डे क्रिकेटमध्ये रोहितनं 217 सामन्यांत 48.74च्या सरासरीनं 8676 धावा केल्या आहेत. त्यात 27 शतकं आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. मागील 3-4 वर्षांत मर्यादित षटकांच्या सामन्यात रोहितनं सातत्य राखले आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या युवीचा विक्रम आज रोहीत मोडू शकतो. युवराजने 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. रोहितला सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत सातव्या क्रमांकावर येण्यासाठी 26 धावांची गरज आहे. या क्रमवारीत सचिन तेंडुलकर ( 18426), विराट कोहली ( 11406), सौरव गांगुली ( 11363), राहुल द्रविड ( 10889), महेंद्रसिंग धोनी ( 10773) आणि मोहम्मद अझरुद्दीन ( 9378) हे आघाडीवर आहेत.
युवराजने आशिया एकादश संघाकडून तीन सामन्यांत 92 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडून त्यानं केलेल्या धावा या 8609 होतात. रोहितने ( 8676) याबाबतीत युवीला आधीच मागे टाकले आहे. रोहितने विंडीज दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 24 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यानं 51 चेंडूंत 67 धावांची खेळी केली. तिसऱ्या ट्वेंटी-20 त्याला विश्रांती देण्यात आली.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, लोकेश राहूल, मनिष पांडे, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाई होप, शिमरोन हेटमायेर, निकोलस पुरन, रोस्टन चेस, फॅबियन अॅलेन, कार्लोस ब्रेथवेट, किमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, केमार रोच