पोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : टीम इंडियाच्या मधल्या फळीत श्रेयस अय्यर, मनिष पांडे आणि रिषभ पंत यांच्यापैकी तिसऱ्या वन डे सामन्यात कोणाला संधी मिळेल, याची चर्चा सुरू आहे. पण, आज वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या सामन्यात संघ व्यवस्थापन शिखर धवनच्या स्थानावरही विचार करण्याची शक्यता आहे. धनवला आतापर्यंत चार सामन्यांत ( तीन ट्वेंटी-20 व एक वन डे ) 1, 23, 3 आणि 2 अशा धावा करता आल्या आहेत. त्यामुळेच त्याच्या जागी लोकेश राहुलला संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे का, असा प्रश्न नेटिझन्स विचारत आहेत.
वर्ल्ड कप स्पर्धेत राहुलची कामगिरी चांगली झाली होती. संघ व्यवस्थापनाने राहुलची चौथ्या स्थानासाठी निवड केली होती आणि धवनच्या दुखापतीनंतर तो सलामीवीर म्हणूनही खेळला होता. त्याने दिलेली जबाबदारी चांगली पार पाडली. संघात सध्या विराट कोहली, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानावर दावा सांगून आहेत. अशात सलामीचा एक पर्याय राहुलसाठी खुला होतो. त्यामुळे रोहित शर्मासह राहुलला आज सलामीला संधी मिळू शकते. मधल्या फळीत संघात बदल पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे. केदार जाधवच्या जागी मनिष पांडे संघात स्थान पटकावतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाई होप, शिमरोन हेटमायेर, निकोलस पुरन, रोस्टन चेस, फॅबियन अॅलेन, कार्लोस ब्रेथवेट, किमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, केमार रोच