गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यातही विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे.
दुसऱ्या सामन्यातही पाऊस पडला होता. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाला 15 षटके फलंदाजी करता आली होती. पाऊस सातत्याने पडत असल्यामुळे हा सामना थांबवण्याचा निर्णय घेतला होता. डकवर्थ-लुईस नियमांनुसार या सामन्यात भारताला विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात पाऊस पडणार का, हा प्रश्न साऱ्यांना पडलेला आहे.
तिसऱ्या सामन्यावरही पावासाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. हवामान खात्यानुसार मंगळवारी संपूर्ण दिवस पाऊस पडू शकतो. त्यामुळे तिसऱ्या सामन्यावर पावसाचे संकट असल्याचे म्हटले जात आहे.
भारताने मालिका आधीच खिशात घातल्यामुळे भारतीय संघ आजच्या सामन्यात काही बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दीपक चहर, लोकेश राहुल. श्रेयस अय्यर, राहुल चहर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
राहुल कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, पण आजच्या सामन्यात त्याचा सलामीसाठी विचार केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत शिखर धवन किंवा रोहित शर्मा यांच्यापैकी एकाला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. धवनला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे त्याच्याजागी राहुल खेळू शकतो. कर्णधार विराट कोहलीही विश्रांती घेण्यास प्राधान्य देईल. त्याच्याजागी श्रेयस अय्यर अंतिम अकरात एन्ट्री घेईल.
संघात आणखी दोन बदल अपेक्षित आहेत. राहुल व दीपक चहर यांना भारताच्या गोलंदाजी विभागात संधी मिळू शकते. नवदीप सैनी, खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर हे सध्या अंतिम अकरामध्ये आहेत आणि त्यांची कामगिरीही चांगली झाली आहे. दीपकला भुवनेश्वर कुमारच्या जागी संघी मिळू शकते. राहुलला सुंदर किंवा रवींद्र जडेजा यांच्या जागी स्थान मिळू शकते. कृणाल पांड्या संघात कायम राहिल.
संभाव्य संघभारत - रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, मनिष पांडे, कृणाल पांड्या, राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, नवदीप सैनी, खलील अहमद.
वेस्ट इंडिज - एव्हिन लुइस, सुनील नरीन, निकोलस पुरन, शिमरोन हेटमायर, किरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉव्हेल, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, खॅरी पिएरे, शेल्डन कोट्रेल, ओशाने थॉमस.