जमैका, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघाने आपला मोर्चा कसोटी मालिकेकडे वळवला आहे. 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची दणक्यात सुरुवात करण्याचा निर्धार टीम इंडियाने केला आहे. तत्पूर्वी, भारताच्या कसोटी संघातील खेळाडूंनी तीन दिवसीय सराव सामन्यात वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजीत हात साफ केले. बऱ्याच काळापासून फॉर्मात नसलेल्या अजिंक्य रहाणेने सराव सामन्याच्या अखेरच्या दिवशी अर्धशतकी खेळी करून भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. हा सराव सामना अनिर्णित राहिला असला तरी अर्धशतकानं रहाणेचे मनोबल नक्कीच उंचावले असेल.
दुसऱ्या डावात भारताकडून हनुमा विहारी आणि रहाणे यांनी अर्धशतकी केली. विहारीने 125 चेंडूंत 9 चौकार व 1 षटकार खेचून 64 धावा केल्या. त्यानंतर रहाणेने अर्धशतकी खेळी केली. त्यानेही 54 धावा केल्या आणि त्यात चार चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. भारताने दुसरा डाव 5 बाद 188 धावांवर घोषित करून वेस्ट इंडिज अ संघासमोर विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात विंडीजने 3 बाद 47 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.