फ्लोरीडा: वेस्ट इंडिज दौर्यासाठी महेंद्र सिंग धोनाच्या जागी युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. तसेच त्याला जास्त संधी देणार असून पंतला गरज भासल्यास धोनी देखील पंतला मार्गदर्शन करणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
भारताचा वेस्ट इंडिज दैऱ्याच्या पहिल्या ट्वेंटी- 20 शनिवारी पार पडला. या सामन्यात ऋषभ पंतच्या या कृत्यामुळे सर्वांनाच धोनीची आठवण आली. अखेरच्या षटकात सैनीचा फुलटॉस चेंडू थेट पॅडवर आदळला. सैनीसह पंतने मोठ्या प्रमाणात अपिल केलं. मात्र, हे अपिल पंचांनी फेटाळून लावलं.त्यानंतर सैनी डीआरएस घेण्याबाबत साशंक असल्याचे दिसून आले. परंतू पंतने कोहलीला डीआरएस घेण्यास भाग पाडले आणि निर्णय भारताच्या बाजूने लागल्याने कोहलीने पंतचे कौतुक केले.
डीआरएसबद्दल भारताचा माजी कर्णधार धोनीचा हात कोणीच धरू शकत नाही. त्याचं यष्टीरक्षण करतानाची चपळाई आणि अचूक नजर यामुळं अनेकदा सामना भारताच्या बाजूनं झुकला आहे. आता पंतने पहिल्याच सामन्यात अशी चुणूक दाखवल्यानं तोसुद्धा धोनीच्या पावलावर पाऊल टाकत असल्याची चर्चा रंगली आहे.
वेस्ट इंडिजच्या माफक 96 धावांच्या आव्हानाचा भारताने यशस्वीपणे पाठलाग केला. पण हा यशस्वी पाठलाग करताना अडखळत हा सामना जिंकला. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 25 धावा केल्या. तर विराट कोहली आणि मनिष पांडे यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात भारताला यश मिळाले. त्यानंतर सातत्याने वेस्ट इंडिजचे फलंदाज बाद होत गेले. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी टिच्चून मारा केला आणि सातत्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजाना बाद केले. वेस्ट इंडिजकडून कायरन पोलार्डचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही.