Join us  

India vs West Indies: शानदार निवृत्तीची संधी गेलने गमावली; आता कारकीर्द आली धोक्यात

गेल नावाचे वादळ आता थंडावले, असे साऱ्यांना वाटले. पण गेलने आपण निवृत्त झालोच नाही, असे सांगत सर्वांना धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 8:43 PM

Open in App

पोर्ट ऑफ स्पेन, भारत विरूद्ध वेस्ट इंडिज : भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज ख्रिस गेलने धडाकेबाज खेळी साकारली. या सामन्यात बाद झाल्यावर गेलला भारतीय संघाने निरोप दिला. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी गेलची गळाभेट घेतली. त्यानंतर गेलने बॅटवर हेल्मेट ठेवत चाहत्यांचा निरोप गेला. गेल नावाचे वादळ आता थंडावले, असे साऱ्यांना वाटले. पण गेलने आपण निवृत्त झालोच नाही, असे सांगत सर्वांना धक्का दिला. पण आता गेलला खेळवायचे की नाही, हा निर्णय आता निवड समितीच्या हाती आहे. जर त्यांनी गेलला यापुढे संधीच दिली नाही तर त्याला मैदानात सामना न खेळता निवृत्ती जहीर करावी लागेल. त्यामुळे गेलने शानदाल निवृत्तीची संधी गमावली, अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे.

तिसऱ्या सामन्यात गेलने ४१ चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७२ धावांची तुफानी खेळी साकारली होती. गेलला यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने विराट कोहलीकरवी झेलबाद केले.

गेलने विश्वचषकात निवृत्तीचे संकेत दिले होते. पण आपण कधी निवृत्त होणार, हे मात्र गेलने सांगितले नव्हते. विश्वचषकाच्यावेळी गेलने आपल्या कारकिर्दीबाबत भाष्य केले होते. पण त्यामधून गेल कधी निवृत्त होणार हे नेमके कळत नव्हते. गेल विश्वचषकाच्या वेळी म्हणाला होता की, "माझ्या कारकिर्दीचा हा काही शेवट नाही. मी कदाचित अजून एक मालिका नक्कीच खेळेन. आता विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्ध मी कदाचित कसोटी मालिका खेळेन. त्यानंतर भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मी नक्कीच खेळणार आहे. पण ट्वेन्टी-२० मालिकेत मात्र मी खेळणार नाही."

 गेलला भारताविरुद्धची कसोटी मालिका खेळायची होती. पण निवड समितीने गेलला कसोटी संघात स्थान दिले नाही. त्यामुळे आता भारताविरुद्धची कसोटी मालिका तो खेळू शकणार नाही. पण याच धर्तीवर जर निवड समितीने गेलला ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय संघात स्थान दिले नाही, तर गेलला निवृत्ती घेण्यावाचून पर्याय उरणार नाही. त्यामुळे गेलने जर तिसऱ्या सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली असती तर त्याला थाटामाटात निरोप देता आला असता, असे म्हटले जात आहे.

टॅग्स :ख्रिस गेलभारत विरुद्ध वेस्ट इंडिज