मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना वानखेडे स्टेडियमऐवजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळविण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयाला आव्हान देणारी मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. त्यामुळे क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय)चा ब्रेबॉर्नवर सामना भरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.एमसीएने दाखल केलेल्या अनेक केसेस सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे आम्हाला या प्रकरणी हस्तक्षेप करायचा नाही, असे न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हणत एमसीएला दिलासा देण्यास नकार दिला. एमसीए सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.‘‘एमसीए ‘होस्टिंग अॅग्रीमेंट’वर सह्या करू शकत नाही म्हणून बीसीसीआयने हा सामना ‘वानखेडे’वरून हलविण्याचा निर्णय घेतला. आम्ही ‘वानखेडे’वर हा सामना ठेवला होता. तिकीट विक्री, सामन्याच्या प्रसारणासंदर्भातील अधिकाराबाबत सर्व अटी व शर्ती तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासकांनी या करारावर सह्या न केल्याने आम्ही हा करार बीसीसीआयकडे सादर करू शकलो नाही. सध्या एमसीएवर कोणी प्रशासक नाही,’’ असे एमसीएचे वकील एम. एम. वशी यांनी गेल्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले.२९ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्याच्या तिकीट विक्रीस स्थगिती देण्यास न्यायालयाने १७ आॅक्टोबर रोजी नकार दिला होता. आंतरराष्ट्रीय क्रिक्रेट सामना खेळविण्यासाठी ब्रेबॉर्न स्टेडियम योग्य नाही. २००९ मध्ये या स्टेडियमवर सामना खेळविण्यात आला होता, असे वशी यांनी न्यायालयाला सांगितले होते.