फ्लोरिडा: वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात भारतानंवेस्ट इंडिजवर 22 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2- 0 अशी आघाडी घेतली आहे. तसेच या मालिकेतला तिसरा सामना मंगळवारी गयाना येथे रंगणार आहे. या सामन्यात नवख्या खेळाडूंना संधी देणार असल्याचे संकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिले.
कोहली म्हणाला,'' मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे आमचे लक्ष्य होते. ते आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित एक सामन्यात नव्या खेळाडूंना संधी मिळू शकते.
त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झालेल्या खेळाडूंपैकी तिसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात श्रेयस अय्यर, दिपक चहर आणि राहुल चहरला देखील संधी मिळणार असल्याचे समजते.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माची दे दणादण फलंदाजी पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत रोहितने भाराताल आक्रमक सुरुवात करून दिली. रोहितने 51 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 67 धावांची खेळी साकारली. रोहितनं या खेळीच्या जोरावर युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 105 षटकारांचा गेलचा विक्रम रोहितनं काल मोडला. रोहितच्या या दमदार सुरुवातीमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 167 धावा करता आल्या.
वेस्ट इंडिजच्या डावाला सुरुवात होताच भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरनं शानदार गोलंदाजी करत पहिल्या तीन षटकांमध्ये सलामीवीरांना माघारी धाडलं. यानंतर पूरन आणि पॉवेल यांनी ७६ धावांची भागिदारी केली. मात्र पूरनच्या संथ खेळीमुळे विंडीजला अपेक्षित धावगती राखता आली नाही. पांड्यानं पूरन आणि पॉवेलला बाद करत वेस्ट इंडिजला लागोपाठ दोन धक्के दिले. त्यानंतर वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना पावसानं व्यत्यय आणल्यानं खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी वेस्ट इंडिजनं 15.3 षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ९८ धावा केल्या होत्या. पावसानं विश्रांती न घेतल्यानं अखेर डकवर्थ लुईसनुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं.