मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वाढदिवशी तुम्हाला कधी असे काही गिफ्ट मिळते की, तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. तुमचा आवडता खेळाडू तुम्हाला जर वाढदिवसाला भेटला तर तो दिवस तुमच्या कायम स्मरणात राहू शकतो. अशीच एक गोष्ट घडली आहे. एक वेस्ट इंडिजचा चाहता थेट कॅनडाहून इंग्लंडमध्ये सामना पाहण्यासाठी आला आणि यावेळी त्याला गेल पावल्याचे पाहायला मिळाले.
वेस्ट इंडिजचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीमधून जवळपास बाहेर पडला आहे. पण तरीही वेस्ट इंडिजच्या चाहत्यांना जास्त फरक पडलेला नाही. कारण वेस्ट इंडिजचे चाहते प्रत्येक सामना एन्जॉय करतात. त्यामुळे आजच्या भारताविरुद्धच्या सामन्यासाठीही वेस्ट इंडिजच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती.
आपल्या वाढदिवशी हा चाहता आपल्या लाडक्या वेस्ट इंडिजचा सामना पाहण्यासाठी आला होता. यावेळी आपला आवडता खेळाडू आपल्याला भेटेल की नाही, हे मात्र त्याला माहिती नाही. सामना सुरु होण्यापूर्वी हा चाहता मैदानात दाखल झाला. यावेळी त्याने एक फलक बनवला होता. या फलकावर त्याने आपल्या वाढदिवसाबद्दल लिहिले होते, त्याचबरोबर आपण हा सामना पाहायला कुठून आलो आहोत हेदेखील लिहिले होते.
सराव करत असताना गेलने हा फलक पाहिला. सराव संपल्यावर गेल या चाहत्याकडे गेला आणि त्याची फोटो काढण्याची इच्छाही पूर्ण केली. वाढदिवशी या चाहत्याला ही अतुलनीय भेट मिळाल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्माने केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला फक्त १८ धावा करता आल्या. पण या १८ धावांच्या खेळीमध्येही रोहितने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.
भारतीय संघाला गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात लवकरच धक्का बसला. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( 18) सहाव्या षटकात झेलबाद होऊन माघारी परतला. केमार रोचच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक शे होप्सच्या हाती झेल देऊन बाद झाला. पण, त्याला बाद देण्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. रोचने टाकलेला इनस्विंग रोहितच्या बॅट अन् पॅडच्या मधून थेट यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. मैदानावरील पंचांनी यावर निकाल दिला नाही पण विंडीजनं तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. त्यात चेंडू बॅट अन् पॅडच्या मधून जाताना दिसत होता. पण, तो बॅटीला चाटून गेली की पॅडला याबाबत स्पष्टता नव्हती, तरीही तिसऱ्या पंचांनी रोहितला बाद दिले आणि नेटिझन्सने टीकेची झोड उठवली.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकारांचा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने ३४५ सामन्यांमध्ये २२५ षटकार लगावले आहे. रोहितने आजच्या सामन्यात षटकार लगावला आणि धोनीशी बरोबरी केली आहे. रोहितने २११ सामन्यांमध्ये २२५ षटकार लगावले आहेत.