मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानेवेस्ट इंडिजवर दममाखदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ ११ गुणांसह उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २६८ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाटलाग करताना वेस्ट इंडिजचे फलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांच्या वेगवान गोलंदाजीचे शिकार ठरले. भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला भारताचे आव्हान पेलवले नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
विराट कोहलीने रचलेल्या भारताच्या धावसंख्येच्या पायावर महेंद्रसिंग धोनीने चांगलाच कळस रचला. त्यामुळे भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 268 धावा करता आल्या. कोहली-पंड्या यांच्याबरोबरच हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांचेही उपयुक्त योगदान मिळाले. कोहलीने या सामन्यात ७२ धावा केल्या आणि धोनीने नाबाद ५६ धावांची खेळी साकारली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघा या सामन्यात मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण भारताला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. रोहितला या सामन्यात फक्त १८ धावाच करता आल्या.
रोहित बाद झाल्यावर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी चांगलीच जमली. पण अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त दोन धावांची गरज असताना राहुल बाद झाला. केमार रोचने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. रोचचा हा स्पेल भन्नाट होता. कारण या स्पेलमध्ये रोहितनंतर विजय शंकर आणि केदार जाधव यांना बाद केले. या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही.
केदार जाधव बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला. या सामन्यात धोनीला यष्टीरक्षक शाई होपकडून जीवदान मिळाले. कोहलीने यावेळी अर्धशतक पूर्ण करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २० धावांचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला, या यादीमध्ये आता कोहली अव्वल स्थानावर आहे. अर्धशतक झळकावल्यावर कोहली शतकाच्या दिशेने कूच करत होता. पण एक चूक त्याला चांगलीच भोवली आणि शतक पूर्ण न करताच तो बाद झाला. कोहलीने ८२ चेंडूत ८ चौकारांच्या जोरावर ७२ धावा केल्या. कोहली बाद झाल्यावर धोनी आणि हार्दिक पंड्या यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
महेंद्रसिंग धोनी तिसऱ्यांदा स्टम्पिंग होताना वाचला, होपने दिले जीवदानभारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्यांदा स्टम्पिंग होणार होता. पण यावेळी त्याला जीवदान दिले ते वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक शाई होपने. पण नेमके घडले तरी काय ते जाणून घ्या...
ही गोष्ट घडली ती ३४व्या षटकात. यावेळी फिरकीपटू फॅबियन अॅलेन गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनी मोठा फटका मारण्यासाठी पुढे सरसावला. पण यावेळी चेंडूने धोनीला चकवा दिला आणि चेंडू यष्टीरक्षक होपच्या दिशेने गेला. हा चेंडू उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता. त्यामुळे हा चेंडू थेट होपच्या हातामध्ये आला नाही. हा चेंडू जेव्हा होपच्या हातामध्ये आला तेव्हा धोनीला आपल्याकडून चेंडू हुकला आहे, हे समजले. धोनी तेव्हा मागे फिरण्यासाठी तयार झाला. जेव्हा होपच्या हातामध्ये चेंडू आला तेव्हाही धोनी क्रिझच्या बाहेर होता. पण तरीही होपला धोनीला यष्टीचित करता आले नाही.
विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; सचिन, लारा या दिग्गजांना सोडले मागेभारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. हा विश्वविक्रम रचताना कोहलीने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोन्ही माजी महान खेळाडूंना मागे टाकले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला होता. आता त्याला सर्वात जलद 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम नावावर करून सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या महान फलंदाजांना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा कोहली जगातील बारावा, तर तेंडुलकर ( 34357) आणि राहुल द्रविड ( 24208) यांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीच्या नावावर वन डेत 11020, कसोटीत 6613 आणि ट्वेंटी-20 2263 धावा आहेत.