फ्लोरीडा: भारताचा विंडीजविरुद्धचा दूसरा ट्वेटी- 20 सामना आज (रविवारी) रात्री 8 वाजता रंगणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिका जिंकण्यास सज्ज झाली आहे. तर वेस्ट इंडिज संघ मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करणार आहे. भारताने शनिवारी झालेल्या पहिल्या ट्वेटी- 20 सामन्यात 4 विकेट्स राखून विजय मिळवत 1- 0 अशी आघाडी घेतली आहे.
पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या माफक 96 धावांच्या आव्हानाचा भारताने यशस्वीपणे पाठलाग केला. पण हा यशस्वी पाठलाग करताना अडखळत हा सामना जिंकला. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 25 धावा केल्या. तर विराट कोहली आणि मनिष पांडे यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात भारताला यश मिळाले. त्यानंतर सातत्याने वेस्ट इंडिजचे फलंदाज बाद होत गेले. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी टिच्चून मारा केला आणि सातत्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजाना बाद केले. वेस्ट इंडिजकडून कायरन पोलार्डचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही.