मुंबई, भारत वि. वेस्ट इंडिज : भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. गेली दीड महिने भारतीय क्रिकेटचाहते जे स्वप्न पाहत होते, त्याचा न्यूझीलंडकडून चुराडा झाला. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तेथे तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांसह दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघात काही नवीन चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड 19 जुलैला होणार आहे.
विंडीज दौऱ्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली जाऊ शकते. याशिवाय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही विश्रांती देण्याची शक्यता आहे. धोनी लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतो, अशी चर्चा आहे. पण, कोहली आणि बीसीसीआयनं याबाबत काहीच माहिती दिलेली नाही.
वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेला 22 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी या खेळाडूंना A संघासोबत विंडीज दौऱ्यावर पाठवले आहे. 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत तीन ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत आणि आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता भारतीय संघात काही खेळाडूंना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. 8 ते 14 या कालावधीत तीन वन डे सामने होतील.
त्यामुळे विंडीज दौऱ्यात दीपक चहर, खलील अहमद, नवदीप सैनी आणि आवेश खान यांना संधी मिळू शकते. चरहने आयपीएलमध्ये 17 सामन्यांत 22 विकेट घेतल्या आहेत, तर खलीलनं 19 विकेट घेतल्या आहेत. फिरकीपटू राहुल चहर, मयांक मार्कंडे आणि श्रेयस गोपाळ यांनाही संधी मिळू शकते.