पोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : आज 73व्या स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे भारतीय क्रिकेट संघाने देशवासीयांना विजयी भेट दिली आहे. कर्णधार विराट कोहलीने फटकावलेले सलग दुसरे शतक आणि त्याला श्रेयस अय्यरने दिलेल्या सुरेख साथीच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर सहा गडी राखून मात केली. या विजयासह भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकासुद्धा 2-0 अशा फरकाने जिंकली.
वेस्ट इंडिजने दिलेल्या 255 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र रोहित 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांनी फटकेबाजी करून भारताचा डाव सावरला. पण शिखर धवन 36 आणि ऋषभ पंत शून्यावर बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला. संघ संकटात सापडला असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरली. त्याला श्रेयस अय्यरने सुरेख साथ दिली. कोहली आणि श्रेयस अय्यरने चौथ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी करत संघाला दोनशेपार मजल मारून दिली. मात्र भारताचा विजय दृष्टीक्षेपात असतानाच श्रेयस अय्यर 65 धावा फटकावून बाद झाला. विराटने कॅरेबियन गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवत मालिकेतील आपले सलग दुसरे आणि एकूण 43 वे शतक पूर्ण केले. त्यानंतर विराट कोहली (नाबाद 114) आणि केदार जाधव ( नाबाद 19 ) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण करताना 33व्या षटकात भारताला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी सलामीवीर ख्रिस गेल आणि एव्हिन लेव्हिस यांनी केलेल्या तुफानी भागादारीच्या जोरावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने निर्धारित 35 षटकांत 7 बाद 240 धावा फटकावल्या. त्यानंतर भारतीय संघाला डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार 35 षटकांत 255 धावांचे आव्हान देण्यात आले होते. पावसाचा व्यत्यय आल्याने 35 षटकांच्या खेळवण्यात आलेल्या या लढतीत वेस्ट इंडिजला चांगल्या सुरुवातीनंतर तिचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही. मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेशा खेळ केला. सलामीवीर ख्रिस गेलने 41 चेंडूत 72 धावांची आतिषबाजी केली. त्याने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 8 चौकार लगावले. त्याने लेविस (43 धावा) याच्यासोबत पहिल्या गड्यासाठी 11 षटकांतच 115 धावांची भागीदारी केली. मात्र सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर वेस्ट इंडिजच्या उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. त्यातच लढतीत पावसाचा व्यत्यय आल्याने सामना काही काळासाठी थांबवावा लागला. त्यावेळी वेस्ट इंडिजने 22 षटकांत 2 बाद 158 धावा केल्या होत्या. पावसामुळे रात्री उशिरा सामना सुरू झाला तेव्हा प्रत्येकी 35 षटकांचा करण्यात आला. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत कॅरेबियन फलंदाजांना मोकळीक दिली नाही. त्यातच शाई होप (24), शिमरॉन हेटमायर (25), निकोलस पुरन (30), जेसन होल्डर (14) आणि कार्लोस ब्रेथवेट (16) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. अखेरीस विंडीजने 35 षटकांत 240 धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळवले. भारताकडून खलिल अहमदने 3, मोहम्मद शमीने 2 तर जडेजा आणि चहल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.