नवी दिल्लीः सामन्यागणिक नवनवे विक्रम रचणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. विराटचा फॉर्म पाहता, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत तो हा विक्रम मोडेल असंच चित्र आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरण्याची नामी संधी 'कॅप्टन कोहली'ला आहे. विंडिजविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांमध्ये १८७ धावा केल्यास तो सचिन तेंडुलकरला मागे टाकेल.
सचिनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३९ वनडे सामन्यांमध्ये ५२.७३ च्या सरासरीने १५७३ धावा केल्यात. त्यात चार शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, विराट कोहली सध्या दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानं विंडिजविरुद्धच्या २७ वनडे सामन्यांमध्ये ६०.३०च्या सरासरीने १३८७ धावा कुटल्यात. त्याच्या खात्यात चार शतकं आणि नऊ अर्धशतक जमा आहेत. येत्या मालिकेत तो अव्वल क्रमांकावर झेप घेऊ शकेल.
विंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय वीरांच्या यादीत राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडनं तीन शतकं आणि आठ अर्धशतकांच्या जोरावर ४० सामन्यांमध्ये १३४८ धावा केल्यात.