अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अॅशेस मालिकेतून सुरुवात झाली. पण, भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना उद्यापासून खेळणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका ही जागतिक अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत खेळवली जाणार आहे. नव्या नियमानुसार कसोटी क्रिकेटच्या जर्सीवरही आता खेळाडूंचे नाव आणि नंबर दिसणार आहे. या नव्या जर्सीबद्दल काय म्हणतायत भारतीय खेळाडू, ते व्हिडीओमध्ये पाहा...
या नव्या जर्सीत कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, लोकेश रुहालसह सर्व खेळाडूंनी फोटोशूट केले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या जर्सीवर दिसणारेच नंबर कसोटी क्रिकेटच्या जर्सीत दिसत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार कोहली आणि रोहितचा जर्सी क्रमांक हा अनुक्रमे 18 व 45 असाच आहे. चेतेश्वर पुजारा 25 क्रमांकाच्या, तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे 3 क्रमांकाच्या जर्सीत दिसत आहे. अनुभवी फिरकीपटू आर अश्विनच्या जर्सीवर 99 क्रमांक दिसत आहे.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यानंतर आता टीम इंडियाच्या खेळाडूंची उत्सुकता सर्वांना लागली होती. बुधवारी टीम इंडियाच्या कसोटी जर्सीचे अनावरण करण्यात आले. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक मालिकेत 120 गुण देण्यात येणार आहेत. 2 वर्ष चालणाऱ्या या स्पर्धेत अव्वल 9 संघांमध्ये एकूण 27 कसोटी मालिकेत 72 सामने होणार आहेत आणि त्यानंतर अव्वल दोन संघांमध्या जेतेपदाचा सामना होणार आहे.
1 ऑगस्ट 2019 पासून या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेनुसार अव्वल 9 संघ पुढील दोन वर्षांत होम-अवेय अशा प्रत्येकी तीन-तीन कसोटी मालिका खेळणार आहेत. अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे जेतेपदाचा सामना होईला आणि विजेत्या संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान मिळेल
आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल नऊ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानुसार ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे संघ पात्र ठरले आहेत. ही स्पर्धा पुढील दोन वर्ष विविध देशांमध्ये खेळवण्यात येईल.
या स्पर्धेंतर्गत इंग्लंड 22 सामने खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( 19), भारत ( 18), दक्षिण आफ्रिका ( 16), वेस्ट इंडिज ( 15), न्यूझीलंड ( 14), बांगलादेश ( 14), पाकिस्तान ( 13) आणि श्रीलंका (13) यांचा क्रमांक येतो.