पोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाची वेस्ट इंडिज दौऱ्यात चमकदार कामगिरी होत आहे. पण चांगली कामगिरी होत असताना भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. वेस्ट इंडिजमध्ये गैरवर्तन केल्यामुळे भारतीय संघातील एका सदस्याला दौरा अर्धवट सोडत थेट भारतात धाडले आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, " वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर सध्या भारतीय संघ आहे. या दौऱ्यादरम्यान भारतीय संघ 'जल संरक्षण' या योजनेअंतर्गत शुटींग करत आहे. पण हे शुटींग सुरु असतानाच वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने एक मेल केला आहे. या इ-मेलनुसार भारतीय संघातील सदस्याला थेट भारतात धाडण्यात आले आहे. यादरम्यान भारतीय संघातील सदस्याने वरीष्ठ सरकारी अधिकारी आणि बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांबरोबर गैरवर्तन केले आणि त्यामुळेच त्याला थेट भारतात पाठवण्यात आले."
भारतीय दुतावासातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भारतीय संघातील सदस्याला दूरध्वनी केला होता. या दूरधवनीचे उत्तर या सदस्याने दिले नाही. त्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनीही त्याला दूरध्वनी केला, पण त्यालाही कोणतेच उत्तर या सदस्याने दिले नाही. त्यामुळे या सदस्याला थेट भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता भारतीय संघातील कोणत्या सदस्याला दौरा अर्धवट सोडून मायदेशी धाडण्यात आले आणि याचा संघावर कोणता परीणाम होईल, याची उत्सुकता आता तुम्हाला असेल. भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आता सुनील यांचे संघाचे व्यवस्थापक पदही जाणार असल्याचे म्हटले जात आहे. आता बीसीसीआय त्यांच्यावर कोणती कारवाई करते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीलेले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वन डे सामना आज म्हणजे 14 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. पण, त्याचा निकाल भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री म्हणजे 15 ऑगस्टला लागणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि तिसरा सामना जिंकून मालिका 2-0 अशी खिशात घालण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 15 ऑगस्टला पाच सामने खेळले आहेत आणि हे सर्व कसोटी सामने आहेत.