- अयाझ मेमन ( कन्सल्टिंग एडिटर लोकमत)
ट्वेंटी- २० विश्व चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिजला भारताने ३-० असे पराभूत केले. या मालिकेत ख्रिस गेल वगळता वेस्ट इंडिजकडे ट्वेंटी- २० तील दिग्गज खेळाडू होते. मात्र त्यांना अपेक्षेनुसार खेळ करता आला नाही. सुरुवातीचे दोन सामने फ्लोरिडात होते. येथे दोन्ही संघांसाठी वेगळी परिस्थिती होती. या मालिकेमुळे वेस्ट इंडिजला खूप मेहनत करावी लागेल. भारतासाठी ही मालिका चांगली ठरली. पुढच्या वर्षी ट्वेंटी- २० विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. त्यामुळे संघाची बांधणी करण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी ही मालिका योग्य ठरली.
तिसऱ्या सामन्यात भारताने ज्या खेळाडूंना संधी दिली, त्यांनीदेखील शानदार खेळ केला. मला आशा आहे, भारतीय संघ एकदिवसीय मालिका आणि कसोटीतदेखील अशीच कामगिरी करेल. टी २० मालिकेत चहर बंधूंना खेळण्याची संधी मिळाली. सैनीनेदेखील चांगली गोलंदाजी केली. भारतीय खेळाडूंमध्ये किती गुणवत्ता आणि महत्त्वाकांक्षा आहे, हेच या खेळाडूंच्या शानदार कामगिरीवरून दिसते.याचे पूर्ण श्रेय भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या व्यवस्थेला द्यायला हवे. त्यामुळे संपूर्ण देशातून क्रिकेटचे खेळाडू समोर येत आहेत. जलदगतीगोलंदाजांमध्ये चहर, सैनी आणि खलील हे गुणवान खेळाडू आहेत. तसेच नियमित गोलंदाज बुमराह, भुवनेश्वर हे देखील अजून युवाचआहेत. देशभरातून गुणवान खेळाडू समोर येत आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रशासकांनी देशभरातील खेळाडूंच्या गुणांना पैलू पाडणे, हे त्यांचे महत्त्वाचे काम असेल.
आयपीएलसह देशातंर्गत स्पर्धा यासाठी महत्त्वाची ठरेल. त्याचे नियोजन करणे, हे महत्त्वाचे ठरेल. रिषभ पंत याने तिसऱ्या सामन्यात दमदार खेळ केला आणि सामना जिंकून दिला. त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा आहेत. जर त्याला धोनीची जागा घ्यायची असेल. तरत्याला सामने जिंकून द्यावेच लागतील. भारताकडे यष्टिरक्षक फलंदाज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पंतला खूप मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. त्याने सातत्याने असाच खेळ करायला हवा.