भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. 2019 या मालिकेतील ही टीम इंडियाची अखेरची वन डे मालिका आहे. त्यामुळे वर्षाचा शेवट गोड करण्याचा दोन्ही संघांचा निर्धार असणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा यांच्यात शर्यत पाहायला मिळणार आहे. रोहितनं वन डे वर्ल्ड कप स्पर्धा गाजवली, त्या तुलनेत विराटला अजूनही दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे वर्षाअखेरीत ती उणीव भरून काढत क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या खेळीनं मंत्रमुग्ध करण्यासाठी विराट उत्सुक आहे. त्यामुळे आता विराट-रोहित यांच्या शर्यतीत कोण बाजी मारतं हे मालिका संपल्यानंतर कळेलच, पण त्यांच्यातली शर्यत मात्र आजपासून सुरुवात होणार आहे.
वन डे क्रिकेट स्पर्धेत 2019मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट अव्वल स्थानी आहे. त्यानं 23 सामन्यांत 64.40च्या सरासरीनं 1288 धावा केल्या आहेत. या शर्यतीत रोहित 1232 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितनं 25 सामन्यांत 53.56च्या सरासरीनं या धावा केल्या आहेत. त्यामुळे या मालिकेनंतर या क्रमवारीत अदलाबदल होते, की स्थान तसेच राहते, याची उत्सुकता लागली आहे.
विराटनं हे अव्वल स्थान कायम राखल्यास त्याच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल. वन डे क्रिकेटच्या इतिहासात एका वर्षात सर्वाधिक धावांचा विक्रम तीनपेक्षा अधिक वेळा करणाऱ्या फलंदाजाचा मान विराटला मिळेल. शिवाय सलग तीन वर्ष वन डेत सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाजही तोच ठरणार आहे. विराटनं 2011, 2017 आणि 2018 मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत अव्वल स्थान पटकावले होते. डेसमोंड हायनेस ( 1984, 1985 आणि 1989), सौरव गांगुली ( 1997, 1999 आणि 2000) आणि कुमार संगकारा ( 2006, 2012 आणि 2014) यांनी तीन वर्ष सर्वाधिक धावांच्या विक्रमात अव्वल स्थान पटकावले होते.
वेस्ट इंडिजविरुद्ध रोहितची कामगिरी धमाकेदारच झालेली आहे. त्यानं विंडीजविरुद्ध 76.64च्या सरासरीनं दहा अर्धशतकं आणि 2 शतकं झळकावली आहेत.