पोर्ट ऑफ स्पेन: कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्या दरम्यान रवींद्र जडेजा फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकातील कार्लोस ब्रॅथवेटचा तिसरा चेंडू वाईड होता, परंतु पंचांनी तो दिला नाही. त्यामुळे जडेजाने पंचांकडे निरखून पाहत नाराजी व्यक्त केली. मात्र त्यानंतर पंचांना आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर लगेचच निर्णय बदलून तो चेंडू वाईड देण्यात आला. या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला चांगली सुरुवात मिळाली नाही. शिखर धवन 2 आणि रोहित शर्मा 18 धावांवर बाद झाले. पण त्यानंतर विराट कोहलीने शतक झळकावत संघाची गाडी रुळावर आणली. कोहलीने 14 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 120 धावा केल्या. श्रेयस अय्यरनेही यावेळी दमदार फलंदाजी केली. श्रेयसने 68 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 71 धावा केल्या.
भारताने दिलेल्या 280 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळती झाली होती. मात्र लुईस (65) आणि निकोलस पुरन (42) यांनी दमदार खेळ करत सामन्यात रंगत आणली. मात्र भुवनेश्वर कुमारने विंडीजची मधली फळी कापून काढत भारताचा विजय निश्चित केला. अखेरीस विंडीजचा संपूर्ण डाव 210 धावांत संपुष्टात आला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 4, शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन तर खलील अहमद आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक बळी टिपला.