गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने उभे केलेले 6 बाद 146 धावांचे लक्ष्य भारताने 19.1 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने मैदान मारले. विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी करून संघाचा विजय पक्का केला. पंतने या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नावावर असलेला महत्त्वाचा विक्रम मोडलाच, परंतु धोनीच्या एक पाऊल पुढे टाकले आहे.
147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( 3) लगेच माघारी परतला. लोकेश राहुलही 20 धावा करून बाद झाला. पण, कोहली आणि पंत यांनी संघाचा विजय पक्का केला. कोहलीनं 45 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीनं 59 धावा केल्या, तर पंतने 42 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 65 धावांची खेळी केली. पंतने या खेळीसह धोनीचा विक्रम मोडला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा धोनीचा विक्रम काल मोडला गेला. धोनीनं 2017मध्ये बंगळुरू येथे इंग्लंडविरुद्ध 56 धावांची खेळी केली होती. भारतीय यष्टिरक्षकाची ती सर्वोत्तम खेळी होती. पण, पंतने मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 65 धावा करून हा विक्रम मोडला.
वेस्ट इंडिजला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सलग सहा वेळा पराभूत करण्याचा विश्वविक्रम टीम इंडियाने नावावर केला. भारताने 2018-19च्या दौऱ्यात वेस्ट इंडिजला सलग सहा सामन्यांत पराभूत केले आहे. पाकिस्तानने 2016-17 या कालावधीत सलग पाच विजय मिळवले होते आणि आता ते दुसऱ्या स्थानी सरकले आहेत. दक्षिण आफ्रिका ( 2008-10), श्रीलंका ( 2009-12), ऑस्ट्रेलिया ( 2010-12) आणि पाकिस्तान ( 2017-18) यांनी प्रत्येकी सलग चार विजय मिळवले आहेत. पंतने आणखी एक विक्रम नावावर केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 17 डाव खेळल्यानंतर पंतने 302 धावा केल्या आहेत. त्यानं धोनीचा ( 301) धावांचा विक्रमाला मागे टाकले.
Web Title: India vs West Indies : Rishabh Pant breaks major MS Dhoni record after heroic knock in Guyana T20I
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.