भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातला दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होत आहे. कोलकाताच्या इडन गार्डनवर डे नाइट कसोटी होणार आहे आणि त्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी रोहित शर्माला विश्रांती देण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बांगलादेश मालिकेपूर्वी कर्णधार विराट कोहलीला ट्वेंटी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. सततच्या क्रिकेटमधून येणारा कामाचा ताण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला होता. आता रोहितलाही त्याच कारणामुळे विश्रांती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारतात तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या मालिकेत रोहितला विश्रांती दिली जाऊ शकते. टीम इंडियाचा मर्यादित षटकांच्या संघाचा उप कर्णधार रोहित गेले वर्षभर सातत्यानं खेळत आहे. त्यात इंडियन प्रीमिअर लीगमधील 16 सामन्यांसह 60 हून अधिक सामन्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्यावरील कामाचा ताण लक्षात घेता, त्यालाही विश्रांतीची गरज आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार रोहितला विश्रांती नकोय, परंतु संघ व्यवस्थापनानं भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रकाची जाण त्याला करून दिली आहे. वेस्ट इंडिज मालिकेसाठी 21 नोव्हेंबरला संघ निवड केली जाईल.
विंडीज मालिकेचे वेळापत्रक
- ट्वेंटी-20 मालिका
6 डिसेंबर - मुंबई8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - हैदराबाद
- वन डे मालिका
15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक
या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. 40 दिवसांच्या या दौऱ्यात भारतीय संघ 5 ट्वेंटी-20, 3 वन डे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. त्या मालिकेसाठी रोहित शर्मा संघात असणे महत्त्वाचे आहे. विंडीज मालिकेतून रोहितला विश्रांती दिल्यास त्याच्या जागी मयांक अग्रवालची वर्णी लागू शकते.