मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडीज : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला. करुण नायरला वगळल्याने चहुबाजुंनी टीका होत आहे. माजी निवड समिती प्रमुख आणि माजी कसोटीपटू संदीप पाटील यांनी बीसीसीआयच्या या संघनिवडीवर कडाडून टीका केली आहे. फ्लॉप ठरलेल्या हार्दिक पांड्याला खेळवता, मग करुण नायरवर अन्याय का, असा सवाल त्यांनी केला.
इंग्लंड दौऱ्यात नायरचा भारतीय संघात समावेश होता, परंतु त्याला एकाही सामन्यात खेळवले नाही. त्यानंतर वेस्ट इंडीज मालिकेसाठीच्या 15 सदस्यीय संघातूनच त्याचे नाव वगळण्यात आले. त्यावर माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त करताना बीसीसीआयला टार्गेट केले. त्यात पाटील यांनीही सहभाग घेतला. ते म्हणाले,'' नायरला वगळल्याने दुखी झालो. संघाबाहेर करण्यासारखे त्याने काहीच केलेले नाही. तो खूप प्रतिभावंत खेळाडू आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असताना मी त्याचा खेळ जवळून पाहिला आहे.''
पाटील यांनी नायरच्या अन्यायावर बोलताना हार्दिक पांड्याला दिल्या जाणाऱ्या रॉयल ट्रियमेंटवर भाष्य केले. ते म्हणाले,'' तिहेरी शतक झळकावणे, ही नायरची चुक आहे का? मला निवड समितीवर टीका करायची नाही, परंतु निवडी मागचे निकष काय, हे कळत नाही. एका बाजूला तुम्ही पांड्याला पाठीशी घातला आणि दुसरीकडे प्रचंड क्षमता असलेल्या नायरकडे दुर्लक्ष करता.''