अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
भारताने वन डे आणि टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. रोहित आणि सहकाऱ्यांना घरच्या स्थितीचा लाभ झाला; पण या विजयातील कामगिरींवर नजर टाकल्यास भारतीय संघाचे श्रेष्ठत्व अधोरिखित झाले. भारतीय संघाच्या प्रगतीत हा विजय आनंददायी म्हणावा लागेल. विंडीज संघ कसोटीत माघारला आहे; पण पांढऱ्या चेंडूच्या खेळात हा संघ अतिशय स्पर्धात्मक कामगिरी करतो. तीन वन डे आणि दोन टी-२० लढतीत (हा स्तंभ लिहिपर्यंत) त्यांना पराभव पचवावा लागणे योग्य नाही.
विंडीज संघ उदासीनविंडीजची टी-२० तील कामगिरी फारच प्रभावी आहे. दोनदा विश्वचषक जिंकणारा एक बलाढ्य संघ अशी त्यांची ओळख. अष्टपैलू खेळाडू आणि पॉवर हिटरच्या बळावर सामने फिरविणारे खेळाडू संघात आहेत. तरीही भारतासारखाच टी-२० विश्वचषकात हा संघ अपयशी ठरला होता. येथे येण्याआधी त्यांनी मायदेशात इंग्लंडला धूळ चारली. सध्याच्या संघातील निकोलस पूरन, शेफर्ड, ओडियन स्मिथ अशा किमान आठ खेळाडूंना आयपीएलमध्ये मोठ्या रकमा मिळाल्या, हे सत्य आहे. विंडीजच्या खेळाडूंना या प्रकारात किती मागणी असेल, हे यावरून दिसून आले. या दौऱ्यात विंडीज संघ काहीसा उदासीन वाटला तर भारताने द. आफ्रिकेकडून मार खाल्ल्यानंतरही वन डे आणि टी-२० प्रकारात झपाट्याने जुळवून घेतले. पाचपैकी अनेक सामन्यांत भारतीय खेळाडूंनी विंडीजकडून मोक्याच्या क्षणी विजय हिरावून घेतला.मनोबल उंचाविणारे विजय
गतवर्षी टी-२० विश्वचषकातील दारुण कामगिरी आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या पानिपतानंतर भारतासाठी विंडीजवरील विजय मनोबल उंचावणारा ठरला. दरम्यान, मधल्या काळात नेतृत्वावरून वाद गाजल्यामुळे टीम इंडिया कामगिरीत सावरेल की नाही, अशी शंका होती. विजयामुळे ही शंका दूर झाली. काही महिन्यांनंतर आणखी एक विश्वचषक होईल. अशावेळी फारसे प्रयोग करण्यास वेळ नाही. यादृष्टीने रोहित आणि कोच राहुल द्रविड यांना सहकारी खेळाडूंनी तोलामोलाची साथ दिली, हे विशेष. रोहितच्या दृष्टीने हे विजय त्याच्या नेतृत्वास उभारी देणारे ठरावेत. ज्या अधिकाराने आणि संयमाने संघाचे नेतृत्व केले, त्यामुळे सर्व शंका दूर झाल्या. कोहलीचा उत्तराधिकारी म्हणून रोहितची निवड योग्य होती, याची निवडकर्त्यांनादेखील खात्री पटली.
ईशान किशनने केले निराशलोकेश राहुलच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या ईशान किशनने मात्र घोर निराशा केली. धावा काढून अंतिम एकादशमध्ये स्थान मिळविण्याची त्याच्याकडे संधी होती. चुकीच्या फटकेबाजीमुळे त्याने संधी घालवली. आयपीएल लिलावात त्याला मुंबईने १५.२५ कोटी दिले. आयपीएलमध्ये मिळालेले कोटीचे उड्डाण भारतीय संघात स्थान मिळविण्यास पुरेसे नसते, हे सत्य ईशानने ध्यानात घ्यावे. राष्ट्रीय संघात स्थान कामगिरीच्या बळावरच मिळू शकते.
चहल, बिश्नोई यांनी वेधले लक्षया विजयातील अन्य लाभ काय, असे विचाराल तर मी म्हणेन लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई यांचा प्रभावी मारा. बिश्नोईने पदार्पणात सामनावीराचा किताब जिंकला. बुमराह-शमी यांच्या अनुपस्थितीत हर्षल पटेल आणि दीपक चाहर तसेच भुवनेश्वर यांनी वेळोवेळी शानदार कामगिरी केली. फलंदाजांमध्ये सूर्यप्रकाश यादव याने परिस्थितीनुसार कसा खेळ करावा, हे सिद्ध केले. कोहली आणि पंत यांना फॉर्ममध्ये परतल्याचे पाहून चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला. विंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात कोहलीने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. यामुळे कोहलीच्या फॉर्मवर मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले शंकेचे मळभ निश्चितपणे दूर होऊ शकतील, अशी आशा करायला हरकत नाही. पंतनेदेखील अर्धशतक ठोकून स्वत:च्या कामगिरीवरील शंका दूर केली आहे.