गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजवर 59 धावांनी विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीचे शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 7 बाद 279 धावा केल्या. भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी श्रेयसच्या खेळीचे कौतुक केले आहे. त्यांनी टीम इंडियात चौथ्या स्थानासाठी रिषभ पंत नाही, तर श्रेयस उत्तम पर्याय असल्याचे मत व्यक्त केले आहे. या सामन्यात श्रेयसने 68 चेंडूंत 71 धावा केल्या.
विराट कोहलीचे 42वे शतकं अन् 8 विक्रम!
भारतीय संघ मागील अडीच वर्षांपासून चौथ्या क्रमांकासाठी पर्याय शोधत आहे. या क्रमांकासाठी अनेक पर्यायांची चाचपणीही झाली. पण, सक्षम पर्याय शोधण्यात त्यांना अपयश आले आणि वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याचा मोठा फटका संघाला सहन करावा लागला. गावस्कर म्हणाले,'' विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्याकडून 40-45 षटकांपर्यंत टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळाल्यास चौथ्या क्रमांकासाठी पंत हा पर्याय योग्य आहे. पण, 30-35 षटकांत आघाडीचे तीनही फलंदाज माघारी परतल्यास गंभीर समस्या उद्भवू शकते आणि अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर हा उत्तम पर्याय ठरू शकतो आणि पंतला पाचव्या क्रमांकावर पाठवावे.''
India vs West Indies 2nd ODI: भुवनेश्वरचा भेदक मारा, भारताची वेस्ट इंडिजवर मात
क्विन्स पार्क ओव्हल येथे झालेल्या सामन्यात अय्यर आणि कोहली यांनी 125 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. 24 वर्षीय अय्यरला ट्वेंटी-20 मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही. पण, वन डे मालिकेत त्याला स्थान मिळाले. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर कालच्या लढतीत त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. गावस्कर म्हणाले,''श्रेयसने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याच्याकडे खेळण्यासाठी भरपूर षटकं होती आणि सोबत कर्णधार कोहलीही होता. कोहलीनं सामन्याचा तणाव आपल्याकडे घेतल्यामुळे श्रेयसला खुलून खेळता आले आणि त्याला बरेच काही शिकायलाही मिळाले.''
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार असलेल्या श्रेयसने दमदार कामगिरी केली होती, परंतु निवड समितीनं वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याच्या नावाचा विचार केला नाही.