फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिजः वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ पहिल्यांदा पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. विंडीज दौऱ्यावर दाखल झालेल्या भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात आजपासून होणार आहे. येथे पहिला ट्वेंटी-20 सामना आज खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेत कॅप्टन विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात विश्वविक्रमासाठी शर्यत पाहायला मिळणार आहे.
ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासात रोहितच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. त्यानं 94 सामन्यांत 32.37च्या सरासरीनं 2331 धावा केल्या आहेत. रोहितचा हा विक्रम कोहलीला मोडण्याची संधी आहे.
कोहलीनं 67 सामन्यांत 50.23च्या सरासरीनं 2263 धावा केल्या आहेत. या क्रमवारीत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील 2272 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे आणि कोहली हा विक्रम आज मोडू शकतो.
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात दुसरे स्थान पटकावण्यासाठी कोहलीला 10 धावांची गरज आहे, तर रोहितचा विक्रम मोडण्यासाठी त्याला 68 धावा कराव्या लागतील.
शिवाय सर्व ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर करण्यासाठीही कोहलीला 23 धावा हव्या आहेत. भारताचा सुरेश रैना 303 डावांत 8369 धावांसह अव्वल स्थानावर आहे.
रोहितलाही ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर करण्यासाठी तीन षटकार खेचावे लागतील. या विक्रमात ख्रिस गेल 105 आणि मार्टिन गुप्तील 103 षटकारांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत.
लोकेश राहुलला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावा करण्यासाठी 121 धावांची गरज आहे. या मालिकेत त्यानं पहिल्याच सामन्यात ही खेळी केल्यास ट्वेंटी-20त जलद 1000 धावा करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होईल. त्यानं 24 डावांत 879 धावा केल्या आहेत. सध्या हा विक्रम पाकिस्तानचा बाबर आझमच्या ( 26 डाव) नावावर आहे. कोहलीनं 27 डावांत 1000 धावा केल्या आहेत.