अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव्हन स्मिथ अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात जायबंदी झाला. इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने टाकलेला बाऊंसर स्मिथच्या मानेवर आदळला आणि त्यानंतर ऑसी खेळाडूला मैदान सोडावे लागले. स्मिथ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला नाहीच, शिवाय त्याने तिसऱ्या कसोटीतूनही माघार घेतली. स्मिथ सोबत घडलेल्या या प्रसंगानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही ( बीसीसीआय) खेळाडूंची चिंता सतावू लागली आहे. त्यांनी भारतीय खेळाडूंना नेक गार्डचे महत्त्व समजावून सांगितले आहे.
स्मिथच्या दुखापतीनंतर नेक गार्ड घालावे की नाही, ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. कराही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्याच फिल ह्युजेसलला मानेवर चेंडू आदळल्याने प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर स्मिथसोबत घडलेल्या प्रसंगाने पुन्हा क्रिकेट वर्तुळात फलंदाजांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलिया मंडळाने तर त्यांच्या खेळाडूंना नेक गार्ड घालण्याची सक्ती केली आहे. बीसीसीआयलाही भारतीय खेळाडूंच्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे.
''या संदर्भातला नवा नियम अमलात आल्यानंतर बीसीसीआय कर्णधार आणि सहाय्यक स्टाफला त्याचे महत्त्व समजावून सांगणार आहे. आम्ही खेळाडूंना नेक गार्डबद्दल समजावले आहे. शिखर धवनसह काही खेळाडू त्याचा वापर करतात, परंतु त्यासाठी आम्ही सक्ती करू शकत नाही. त्यांचे कम्फर्टही पाहावे लागणार आहे,'' असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने डेक्कन क्रोनिकलला सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की,''हेल्मेट हा खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी असतो, पण काही खेळाडूंना ते घालून खेळणे पसंत पडत नाही. त्यात नेक गार्ड सोबतच्या हेल्मेटमध्ये खेळाडूंना अवघडल्यासारखे वाटू शकते. पण, जोपर्यंत आयसीसी नेक गार्ड घालण्याचे अनिवार्य करत नाही, तोपर्यंत हा निर्णय खेळाडूंवर सोपवलेला बरा.''
भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला,''युवा खेळाडूंना तुम्ही स्मिथचे अनुकरण करा असे सांगू शकत नाही. शिवाय प्रत्येक संघाकडे जोफ्रा आर्चरसारखा गोलंदाज नाही. फिरोज शाह कोटलावर खेळताना प्रतिस्पर्धी संघाकडे मध्यमगती गोलंदाज असतील तर तुम्हाला नेक गार्डची आवश्यकता कशाला आहे.''