अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः सध्याच्या जमाना हा ट्वेन्टी-२० क्रिकेटचा आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटला जास्त प्रेक्षक मिळत नसल्याचे म्हटले जाते. पण या गोष्टीला छेद देणारे वक्तव्य भारताचा कर्णधार विराट कोहलीने केले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे आता टेस्ट क्रिकेट अधिक रंगतदार होणार आहे, असे मत कोहलीने व्यक्त केले आहे.
याबाबत कोहील म्हणाला की, " कसोटी क्रिकेटचा हा जमाना नाही, ते प्रासंगिक नाही, असे म्हटले जात होते. गेल्या काही वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये चुरस वाढली आहे. पण आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे क्रिकेट अधिक रंगतदार होणार आहे. कारण आता स्पर्धा दुपटीने वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामना हा संघांसाठी महत्वाची ठरणार आहे."
रोहितला खेळवायचं की अजिंक्यला, कोहलीपुढे मोठा प्रश्नभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका काही दिवसांमध्ये खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माला संधी द्यावी की अजिंक्य रहाणेला हा मोठा प्रश्न सध्या कर्णधार विराट कोहलीपुढे आहे. कारण भारतीय संघ जर पाच गोलंदाजांनुसार मैदानात उतरला तर रोहित किंवा अजिंक्य या दोघांपैकी एकालाच पहिल्या कसोटीत खेळण्याची संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे कोहलीला रोहित किंवा अजिंक्य यांच्यापैकी एकालाच निवडावे लागणार, असे वाटत आहे.
नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात अजिंक्यने दमदार अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे अजिंक्य फॉर्मात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या सामन्यात अजिंक्यला संधी मिळायला हवी, असे काही जणांना वाटत आहे. दुसरीकडे रोहितने आपल्या गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे गेल्या कसोटी सामन्याचा विचार केला तर रोहितला संधी मिळायला हवी, असे काही जणांचे म्हणणे आहे. या साऱ्या गोष्टींमुळे आता कोहलीपुढील समस्या वाढली आहे. आता या दोघांपैकी कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांनी आपापला मोर्चा कसोटी मालिकेकडे वळवला आहे. 22 ऑगस्टपासून सुरू होणारी ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोडणारी आहे. 1948मध्ये उभय संघ प्रथम एकमेकांना भिडले होते आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 अशी बाजी मारली होती. त्यानंतर भारताला सलग चार मालिका गमवाव्या लागल्या. 1971 मध्ये सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना भारताला वेस्ट इंडिजवर पहिला कसोटी विजय मिळवून दिला. त्यानंतर भारताने मालिका 1-0 अशी जिंकली होती.
त्यानंतर दोन्ही संघांमध्ये झालेल्या मालिकेचा निकाल समसमान राहिला, परंतु जेतेपदाचे पारडे अनेकदा भारताच्या बाजूने राहिले. मे 2002नंतर वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध कसोटी सामनाच नव्हे तर मालिकाही जिंकता आलेली नाही. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमानांना हा कटू इतिहास पुसण्याची संधी आहे. दोन देशांमध्ये आतापर्यंत 96 कसोटी सामने खेळले गेले. त्यापैकी 30 सामने विंडीजने,तर 20 सामने भारताने जिंकले. उर्वरित 46 सामने अनिर्णित राहिले.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील दहा कसोटींमध्ये भारताने सात सामने जिंकले आहेत. 2002-03 नंतर झालेल्या सातही कसोटी मालिकांमध्ये भारताने बाजी मारली आहे. या सात मालिकांमध्ये भारताने 12 सामने जिंकले आणि 9 सामने अनिर्णित राखले.
1958-59 च्या दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजने 8 बाद 644 धावांवर डाव घोषित केला होता. भारताविरुद्धची त्यांची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने 2018-19च्या राजकोट कसोटीत 9 बाद 649 धावांची खेळी करताना सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पाचवेळा 100 हून कमी धावा केल्या आहेत. 1987-88च्या दिल्ली कसोटीत भारताचा डाव 75 धावांत गडगडला होता, तर 2006मध्ये वेस्ट इंडिजला 103धावांत गुंडाळले होते. भारताविरुद्ध सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम अजूनही रोहन कन्हाई यांच्या नावार आहे. 1958-59च्या कोलकाता कसोटीत कन्हाई यांनी 256 धावा केल्या होत्या. भारतासाठी सुनील गावस्कर यांनी 1983-84 मध्ये चेन्नई कसोटीत विंडीजविरुद्ध 236 धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.
वेस्ट इंडिजने 5 बाद 614 धावांत डाव घोषित केला होता आणि प्रत्युत्तरात भारताला ( 124 व 154) दोन्ही डावांत अपयश आले. भारताला एक डाव व 336 धावांनी नमवून वेस्ट इंडिजने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली होती.