पोर्ट ऑफ स्पेन: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : कर्णधार विराट कोहलीने फटकावलेले सलग दुसरे शतक आणि त्याला श्रेयस अय्यरने दिलेल्या सुरेख साथीच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर सहा गडी राखून मात केली. या विजयासह भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकासुद्धा 2-0 अशा फरकाने जिंकली. या सामन्यात कॅप्टन कोहलीनं विश्वविक्रमाला गवसणी घातली. विशेष म्हणजे सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर या महान फलंदाजांनाही हा विक्रम करता आला नाही.
पहिला वन डे सामना पावसामुळे रद्द करावा लागला. दुसऱ्या सामन्यातही भारताने डकवर्थ लुइस नियमानुसार ५९ धावांनी विजय मिळवला. त्या सामन्यातही कोहलीनं शतकी खेळी केली होती. तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेल्या 255 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने कॅरेबियन गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवत मालिकेतील आपले सलग दुसरे आणि एकूण 43 वे शतक पूर्ण केले. त्यानंतर विराट कोहली (नाबाद 114) आणि केदार जाधव (नाबाद 19) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण करताना 33व्या षटकात भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात कोहलीनं सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, अॅलन बॉर्डर आदी दिग्गजांनाही न जमलेला विक्रम केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका दशकात सर्वाधिक धावांचा विक्रम कोहलीच्या नावावर आहेच, पण त्याला याच कालावधीत असा एक विक्रम नोंदवण्याची संधी आहे, जो कोणालाही अद्याप जमलेला नाही. दशकात 20000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरणार आहे. सुनील गावस्कर यांनी 1970-79 या कालावधीत 22 शतकांसह 5901 धावा केल्या आहेत. अॅलन बॉर्डर यांनी 1980-89 या कालावधीत 23 शतकांसह 12083 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर 1990-99 या कालावधीत 46 शतकांह 14197 धावा आहेत. रिकी पॉटिंगने 2000-2009 या दशकात 55 शतकांसह 18962 धावा केल्या आहेत. या मालिकेपूर्वी कोहलीच्या नावावर 2010 - 2019 या कालावधीत 65 शतकांसह 19784 आंतरराष्ट्रीय धावा होत्या आणि त्याने बुधवारी 20000 धावांचा पल्ला ओलांडला.