पोर्ट ऑफ स्पेन: भारत विरूद्ध वेस्ट इंडिजच्या बुधवारी झालेल्या तीसऱ्या वन डे सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र या दुखापतीबाबत सामन्यानंतर कोहलीने स्पष्टीकरण दिले आहे.
विराट धावांचा पाठलाग करत असताना 27व्या षटकात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज केमार रोचच्या भेदक बाउन्सरने त्याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर देखील त्याने फलंदाजी करत शतक झळकाविले होते. मात्र सामना नंतरच्या मुलाखतीत दुखापत गंभीर नसून अगंठ्याचं नख निघाल्याने रक्त येत होते, त्यामुळे अंगठा फ्रॅक्चर असल्यासारखे वाटत नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
सलामीवीर ख्रिस गेल आणि एव्हिन लेव्हिस यांनी केलेल्या तुफानी भागादारीच्या जोरावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने निर्धारित 35 षटकांत 7 बाद 240 धावा फटकावल्या. त्यानंतर भारतीय संघाला डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार 35 षटकांत 255 धावांचे आव्हान देण्यात आले होते.
वेस्ट इंडिजने दिलेल्या 255 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र रोहित 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांनी फटकेबाजी करून भारताचा डाव सावरला. पण शिखर धवन 36 आणि ऋषभ पंत शून्यावर बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला. कोहली आणि श्रेयस अय्यरने चौथ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी करत संघाला दोनशेपार मजल मारून दिली.
मात्र भारताचा विजय दृष्टीक्षेपात असतानाच श्रेयस अय्यर 65 धावा फटकावून बाद झाला. विराटने कॅरेबियन गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवत मालिकेतील आपले सलग दुसरे आणि एकूण 43 वे शतक पूर्ण केले. त्यानंतर विराट कोहली (नाबाद 114) आणि केदार जाधव ( नाबाद 19 ) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण करताना 33व्या षटकात भारताला विजय मिळवून दिला.